दर्जेदार सुविधांमुळे राष्ट्रीय पातळीवर गौरव, नायर रुग्णालयाला ’एनएबीएच’ दर्जा

मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालय आणि दंत महाविद्यालयाला रुग्णालये आणि वैद्यकीय सेवा प्रदात्यांसाठीचे राष्ट्रीय प्रमाणिकरण मंडळ (नॅशनल अॅव्रेडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल एण्ड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स) अर्थात ‘एनएबीए’चकडून प्रमाणित दर्जा मिळाला आहे. नायर रुग्णालय आणि दंत महाविद्यालयाच्या ठिकाणी रुग्णांना देण्यात येणाऱया सेवा अतिशय गुणवत्तापूर्ण पद्धतीने व सर्व निकष पाळून पुरवल्या जातात. याची ही पोचपावती आहे. महाराष्ट्रातील शासकीय दंत महाविद्यालयांमध्ये आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कार्यक्षेत्रात हा दर्जा मिळवणारे नायर दंत रुग्णालय पहिले रुग्णालय ठरले आहे.

रुग्णालयाने ‘एनएबीएच’ दर्जा मिळवण्याच्या अनुषंगाने सर्व निकष पूर्ण केल्यामुळेच नायर रुग्णालय आणि दंत महाविद्यालयाला हा मान मिळाला.

एनएबीएचकडून प्रमाणिकरण दर्जा प्रदान करताना रुग्णांना लागणारा उपचाराचा कालावधी, संसर्ग नियंत्रण, स्वच्छ उपकरणांचा वापर, जैववैद्यकीय सूचकांचा वापर आदी निकष रुग्णसेवेच्या अनुषंगाने तपासण्यात आले. रुग्णांना देण्यात येणाऱया सेवांमध्ये गुणवत्ता आणि हमी या दोन्ही गोष्टींची पडताळणी यानिमित्ताने करण्यात आली. रुग्णांना वैद्यकीय उपचारादरम्यान रुग्णालयात देण्यात येणारी औषधे, औषधांचा साठा, ज्वलनशील पदार्थ ठेवण्याची पद्धती आणि तेथील उपाययोजना आदी बाबीही यानिमित्ताने तपासण्यात आल्या.