मुंढवा जमिन घोटाळा प्रकरण : पार्थ पवारांकडून चार वर्षांपासून पाठपुरावा

मुंढवा येथील शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात जमिनीचा ताबा मिळण्याबाबत शीतल तेजवानीने केलेल्या अर्जावर तत्काळ सुनावणी घ्यावी. तसेच, अर्जात नमूद केल्याप्रमाणे कब्जा हक्काच्या साऱयाची रक्कम भरून जमीन मूळ वतनदारांच्या कुलमुख्त्यार या नात्याने तेजवानी यांच्या नावावर करावी, असा मागणी करणारा अर्ज अमेडिया कंपनीने 1 जून 2021 रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे केला होता. जमीन मिळवण्यासाठी पार्थ पवार स्वत: चार वर्षांपासून पाठपुरावा करत असल्याचे त्यातून स्पष्ट होत आहे, असा गौप्यस्फोट माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

मुंढवा येथील सर्व्हे नंबर 88 या मिळकतीचा ताबा मिळण्याबाबत तेजवानीने 10 नोव्हेंबर 2020 रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता. 15 डिसेंबर 2020 रोजी हा अर्ज हवेली तहसीलदार यांच्याकडे वर्ग करत, अर्जातील मिळकतीबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा, असा आदेश दिला. मात्र, 15 डिसेंबर 2020 पासून या अर्जाबाबत काहीही कार्यवाही झाली नाही. दरम्यान, 28 डिसेंबर 2020 रोजी अमेडिया कंपनीची स्थापना झाल्यानंतर या प्रकरणाला वेग आला. अमेडिया कंपनीने 1 जून 2021 रोजी जिल्हाधिकारी कुळ कायदा शाखेकडे अर्ज करत तेजवानीने केलेल्या अर्जावर तात्काळ सुनावणी घेऊन साऱयाची रक्कम भरून मूळ वतनदारांची नावे लावावी, अशी मागणी केली. कुळ कायदा शाखेने 11 जून रोजी तेजवानीला खुलासा सादर करण्यास सांगितले. त्यावर तेजवानीने 23 जून 2021 रोजी खुलासापत्र देऊन सारा भरवून नोंदणी करण्याची मागणी केली. 2021 नंतर थेट 30 डिसेंबर 2024 मध्ये कब्जा हक्काची रक्कम भरली. त्यानंतर 2025 मध्ये या मिळकतीचे खरेदीखत करण्यात आले. त्यानंतर अमेडिया कंपनीने मिळकतीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती कुंभार यांनी दिली.

शीतल तेजवानीला सात दिवसांची कोठडी

मुंढवा येथील 40 एकर जागेच्या खरेदी-विक्री घोटाळा प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानी ही बनावट कागदपत्र बनवणे, विश्वासघात, फसवणूक अशा गुह्यांत सराईत असून, तिच्याविरुद्ध सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. या व्यवहारामध्ये मोठे रॅकेट असण्याची शक्यता असल्याने सखोल तपासासाठी दहा दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी बावधन पोलिसांनी केली. त्यावर पौड न्यायालयाने तेजवानी हिला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.