
महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी ‘डोअर टू डोअर’ प्रचार सुरू केला आहे. शहराचा पाणीप्रश्न 20 ते 25 वर्षांपासून चर्चेत आहे. 2,740 कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेण्यात आले, मात्र महापालिका निवडणुकीपूर्वी या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील 200 एमएलडी (दशलक्ष लिटर) पाणी शहरात आणण्यात सत्ताधारी पक्षाला अपयश आले आहे. त्यामुळे उमेदवार प्रचारासाठी दारात आल्यावर पाणी कुठे आहे आणि कधी येणार, असे थेट प्रश्न विचारत आहेत. या प्रश्नामुळे उमेदवारांची बोलती बंद होण्याची वेळ आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाण्यासाठी आधी ऑक्टोबर महिन्याची डेडलाइन दिली होती. मात्र नवे वर्ष सुरू झाले आणि निवडणूक तोंडावर आली तरीही नागरिकांना पाणी काही मिळालेले नाही. महापालिका निवडणुकीत पाणी हाच मुद्दा मतदारांच्या तोंडी आहे आणि घरोघरी प्रचारासाठी येणाऱ्या उमेदवारांची पाण्याच्या प्रश्नावरून बोलती बंद झाली आहे.
यंदाही आश्वासनच
महापालिकेच्या 2005 पासूनच्या निवडणुकीपासून शहरातील पाणीप्रश्न चर्चेत आहे. समांतर पाणी योजनेत शहराची 10 ते 15 वर्षे वाया गेली. त्यानंतर आतादेखील उमेदवारांना मतदारांची आश्वासनांवर बोळवण करावी लागत आहे. यंदा महापालिकेत सत्ता आल्यानंतर एक महिन्यात तुम्हाला मुबलक पाणी नक्की देऊ, असे आश्वासन मतदारांना पुन्हा दिले जात आहे.



























































