
महापालिका निवडणुकीच्या प्रचारात अनेक पक्षांचे हजारो उमेदवार मैदानात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी ‘गर्दी’ला मागणी वाढली आहे. साहजिकच कार्यकर्त्यांचा ‘भाव’ वधारला असून ‘लक्ष्मी’कांत असेल तरच प्यारेलाल काम करणार’ अशी उघड भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांची गोची झाली आहे.
गेल्या काही वर्षांपासून निवडणुकांची गणितेच बदलली असून पैशाला प्रचंड महत्त्व आले आहे. त्यातच पक्षांची आणि उमेदवारांची संख्या वाढल्यामुळे कार्यकर्त्यांची चणचण भासू लागली आहे. या कार्यकर्त्यांची जागा रोजंदारी कामगारांनी घेतली आहे. त्यात घरोघरी धुणीभांडी करणाऱ्या महिलांचा व रोजंदारीवर कष्टाची कामे करणाऱ्या पुरुषांचा समावेश आहे. त्यांना सध्या मोठी मागणी आहे. त्यामुळे तेही ‘भाव’ खाऊ लागले आहेत. जो उमेदवार जास्त पैसे मोजेल तिकडे हे पार्ट टाइम कार्यकर्ते धाव घेत आहेत.
सबका साथ – सबका प्रचार
प्रचार करणाऱ्या या महिला कोणत्याही एका पक्षासाठी काम करत नाहीत. सकाळी एका उमेदवाराचा, दुपारी दुसऱ्या उमेदवाराचा आणि सायंकाळी तिसऱ्याचा प्रचार त्या करत आहेत. त्यामुळे एकाच दिवशी विविध पक्षांच्या प्रचारक म्हणून त्या फिरत आहेत. त्यांच्या जवळच्या पिशवीत तीन ते चार पक्षांचे झेंडे हमखास पाहायला मिळतात.
फडणवीसांच्या रोड शोमध्ये रोजंदारीच्या महिला
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या रविवारच्या रोड शोमध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या तुलनेने अधिक होती. कारण महिलांना मोठय़ा संख्येने रोड शोसाठी आणावे असे सर्व 66 प्रभागातील उमेदवारांना सांगण्यात आले होते. त्यामुळे बहुसंख्य उमेदवारांनी रोजंदारीवरच्या महिलांनाच आणले हाते. या महिलांची जाण्या-येण्याची खास व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर एका ठिकाणी चहा-नाश्ता व रोजाचे पैसे देण्यात आले.
चंद्रपुरात नाश्ता जेवणासह 500 रुपये
साडेतीन ते चार लाख लोकसंख्या असलेल्या चंद्रपूर शहरातील बहुसंख्य घरांत धुणीभांडी व घरकाम करणाऱ्या महिला आहेत. या सर्व महिला सर्वपक्षीय उमेदवारांच्या प्रचारात गुंतल्या आहेत. या महिलांना उमेदवारांकडून किमान 300 ते 500 रुपये रोज दिला जात आहे. त्याचबरोबर चहा, नाश्ता व जेवणाची सोय केली जात आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत घरोघरी पत्रके वाटणे, प्रचारफेरीमध्ये झेंडे घेऊन सहभागी होणे ही कामे या महिला करत आहेत.
घरकामाचे वांधे
घरकाम करणाऱ्या महिला प्रचाराच्या मैदानात उतरल्याने अनेक कुटुंबांची वेगळीच काsंडी झाली आहे. घरातील धुणीभांडी व इतर कामे घरच्याच महिलांना करावी लागत आहेत. त्यातून घरातही खटके उडत आहेत. यावर उपाय म्हणून काही कुटुंबांनी घरकाम करणाऱ्या महिलांना पुढचे काही दिवस जादा पैशांची ऑफर दिल्याचेही समजते.

































































