महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अहिल्यानगरमध्ये पुन्हा ‘लिंबू-टोणा’चा संशय; शहरात भीतीचे सावट

महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असताना अहिल्यानगर शहरातील वातावरण तापले आहे. त्यातच आता लिंबू-टोणा व संशयास्पद हालचालींच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वे स्टेशन रोडवरील आनंदनगर परिसरात घडलेल्या घटनांमुळे संपूर्ण कॉलनीत खळबळ उडाली आहे.

मागील काही दिवसांपासून आनंदनगर परिसरातील विविध ठिकाणी लिंबू आढळून येत असून, यामागे अंधश्रद्धा किंवा जादू-टोण्याचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता, एका दुचाकी वाहनावर एक पुरुष व एक महिला येऊन रस्त्यावर व घरांच्या आसपास लिंबू टाकत असल्याचे दिसून आले आहे. हे फुटेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

स्थानिक नागरिकांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, विना क्रमांकाच्या नंबर प्लेटच्या दुचाकीवरून काही युवक परिसरात येऊन नागरिकांना धमकावत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी या प्रकारात वाढ होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यासोबतच, गेल्या 10 ते 15 दिवसांपासून रात्री 8 वाजल्यानंतर आनंदनगर व स्टेशन रोड परिसरात 5 ते 6 अज्ञात व्यक्ती टोळ्यांच्या स्वरूपात फिरताना दिसत आहेत. ते तोंडाला रुमाल बांधून फिरत असून लहान मुले व मुलींना धमकावणे, पळवून नेण्याची भीती दाखवणे, तसेच मध्ये कोणी हस्तक्षेप केल्यास जिवे मारण्याची धमकी देत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.

या सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे आनंदनगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यास घाबरत आहेत. महिलाही सायंकाळी किंवा रात्री घराबाहेर पडण्यास टाळाटाळ करत आहेत. याच परिसरात अलीकडे घरफोडी व लुटमारीच्या घटनाही घडल्याचे समोर आले असून, नागरिकांची असुरक्षितता अधिक वाढली आहे.या सर्व प्रकारांवर तातडीने नियंत्रण आणले नाही, तर भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आनंदनगर व स्टेशन रोड परिसरात पोलीस गस्त वाढविणे, संशयित सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोषींना अटक करणे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.