क्षयरोग नियंत्रण कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन रखडले, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचा काम बंदचा इशारा

मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेच्या हजारो कर्मचाऱ्यांचा मार्च आणि एप्रिल महिन्याचा पगार आणि गेल्या दिवाळीसाठी देण्यात येणारे सानुग्रह अनुदान (बोनस) रखडले आहे. पालिका प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढून 5 मेपर्यंत ही थकबाकी द्यावी, नाही तर कर्मचारी काम बंद आंदोलन करतील, असा इशारा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने महापालिका आयुक्तांना दिला आहे.

क्षयरोगासारख्या संसर्गजन्य आणि जोखमीच्या आजारांसाठी मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेतील हजारो कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत. तुटपुंजा पगार असल्यामुळे या कर्मचाऱ्यांना घर चालवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. मार्च आणि एप्रिलचा पगार न झाल्यामुळे काहींचे घरभाडे थकले आहे, बँकेचे हप्ते थकले आहेत. कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शाळांना सुट्टी पडल्यामुळे काही जण गावी गेले आहेत तर काहींच्या घरी लग्नकार्य असल्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी वेगळा फंड तयार करण्यात आला असून त्यातून या कर्मचाऱ्यांचा पगार होतो. हा फंड आला नाही तर महापालिका आपल्या माध्यमातून फंडाची तरतूद करून त्यांच्या पगाराची व्यवस्था करत असते. त्यामुळे यावेळीही महापालिका आयुक्तांनी पुढाकार घेऊन या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार आणि सानुग्रह अनुदान द्यावे आणि त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.