मुंबईच्या रस्ते कामातही पालिकेची ढिलाई, मिंधे सरकारचे ते ‘पाच’ कंत्राटदार करताहेत काय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील 397 किमीचे 910 रस्ते सिमेंट-काँक्रीटचे करण्यासाठी जानेवारी 2023 मध्ये मुंबई महापालिकेने मिंधे सरकारच्या मर्जीतील पाच कंत्राटदारांना कार्यादेश दिले, मात्र 10 महिन्यांत 910 रस्ते कामांपैकी फक्त 123 रस्त्यांची कामे सुरू असून उर्वरित 787 सिमेंट-काँक्रीटच्या रस्ते कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे मिंधे सरकारच्या आशीर्वादाने सहा हजार कोटींचे रस्ते कंत्राट मिळवूनही हे पाच कंत्राटदार नक्की काय करत आहेत, असा प्रश्न सर्वसामान्य मुंबईकर विचारत आहेत. दरम्यान, डिसेंबर 2024 पर्यंत मुंबईतील रस्ते पूर्णपणे सिमेंट-काँक्रीटचे करू, असे आश्वासन देणारे मिंधे सरकार पुन्हा तोंडावर आपटले आहे.

मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंट-काँक्रीटचे रस्ते करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सप्टेंबर 2022 मुंबई महापालिकेला दिले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर तातडीने निविदा प्रक्रिया राबवण्याचे निर्देश पालिका आयुक्त डॉ. इकबालसिंह चहल यांनी दिले. रस्ते विभागाने सिमेंट-काँक्रीटचे रस्ते करण्यासाठी सहा हजार कोटींच्या निविदा मागवल्या. या निविदा प्रक्रियेत पाच कंत्राटदार पात्र ठरले आणि 397 किमीचे 910 रस्ते सिमेंट-काँक्रीटचे करण्याचे कार्यादेश जानेवारी 2023 मध्ये देण्यात आले. 397 किमीचे 910 रस्ते सिमेंट-काँक्रीटचे करण्याची वर्क ऑर्डर मिळताच पश्चिम उपनगर व पूर्व उपनगरात कामाला सुरुवात झाली, मात्र मुंबई शहरातील रस्ते सिमेंट-काँक्रीटचे करण्याच्या कामाला कंत्राटदाराने सुरुवात केलेली नाही.

…तर कंत्राटदारांवर कायदेशीर कारवाई करू!

कार्यादेश मिळाल्यानंतरही रस्त्यांच्या कामाला सुरुवात न केलेल्या कंत्राटदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतर कंत्राटदारांवर कायदेशीर कारवाईही सुरू करण्यात येणार आहे, असे पालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

पश्चिम उपनगरात 96 तर पूर्व उपनगरात 27 ठिकाणी कामे सुरू

पश्चिम उपनगरात एकूण 96 ठिकाणी कामे सुरू आहेत. त्यातील 83 ठिकाणी पर्जन्य जलवाहिनीची कामे प्रगतिपथावर असून 13 ठिकाणी वाहतूक मार्गासाठी खोदकाम केले आहे तर पूर्व उपनगरात 27 ठिकाणी कामे सुरू आहेत. त्यातील 19 ठिकाणी पर्जन्य जलवाहिनीची कामे प्रगतिपथावर आहेत. आठ ठिकाणी वाहतूक मार्गावर खोदकाम सुरू असून लवकरच काँक्रीटीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे.