पालिकेच्या व्हॉट्सऍप चॅटबोट, जीआयएसला केंद्राचा विशेष उल्लेखनीय पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळाव्यात, यासाठी पालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने तयार केलेल्या व्हॉट्सऍप चॅटबॉट आणि भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) ला केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि नागरी मंत्रालय अंतर्गत स्मार्ट सिटीज अभियानाकडून विशेष उल्लेखनीय पुरस्कार जाहीर झाला. सूरतला 18 व 19 एप्रिलला होणाऱ्या स्मार्ट सिटीज – स्मार्ट अर्बनायझेशन या परिषदेत पालिकेला हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिकेला हा विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे अभिनंदन केले आहे. मुंबईकरांना आजूबाजूला कोणकोणत्या नागरी सेवा-सुविधा उपलब्ध आहेत, याची माहिती व्हावी, त्याचा आवश्यकतेनुसार उपयोग करता यावा, यासाठी महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे. महापालिकेच्या प्रशासकीय विभाग कार्यालयांची हद्द, महापालिकेची वेगवेगळी कार्यालये, बसथांबे, बसस्थानक, महापालिकेची रुग्णालये व प्रमुख रुग्णालये, उद्याने, वाहनतळ, शाळा, सार्वजनिक प्रसाधनगृहे, अंत्यसंस्कारांची ठिकाणे अशी वेगवेगळ्या प्रकारची माहिती नकाशांवर दिसते.

महापालिकेच्या संकेतस्थळावर जीआयएस प्रणालीच्या माध्यमातून नकाशबद्ध केलेली ही सुविधा महानगरपालिकेचा व्हॉट्सऍप चॅटबॉट क्रमांक 8999 22 8999 यावरदेखील उपलब्ध आहे. व्हॉट्सऍप चॅटबॉटमध्येदेखील सामाजिक- नागरी पायाभूत सुविधांची ही माहिती उपलब्ध झाल्याने भ्रमणध्वनीच्या माध्यमातून मुंबईकरांच्या तळहातावर सुलभ व सहज अशी नकाशाबद्ध माहिती सदैव उपलब्ध राहणार आहे. यापुढे देखील महापालिकेच्या अधिकाधिक सेवा-सुविधा मोबाईल अॅप्लिकेशन आणि व्हॉट्सऍप चॅटबॉटच्या माध्यमातून मुंबईकरांना उपलब्ध केल्या जाणार असून, त्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभाग प्रयत्नशील आहे, अशी माहिती संचालक शरद उघडे यांनी दिली.