
सरकारी कार्याल याचे वारंवार उंबरठे झिजवूनही मुलीला नोकरी न दिल्याने शेतकरी आदिवासी दाम्पत्याने कीटकनाशक पिऊन आपले आयुष्य संपवले आहे. मंगल उघडा (45) व संगीता उघडा (40) अशी त्यांची नावे असून एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या मनमानीने बाधित प्रकल्पग्रस्त पती-पत्नीचा बळी घेतला आहे. मुरबाड तालुक्यातील सुकाळवाडी येथे ही घटना घडली असून निर्दयी सरकारचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. दरम्यान या आत्महत्येची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी अन्य बाधित प्रकल्पग्रस्तांनी केली आहे.
उघडा हे गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या मुलीला नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न करीत होते. प्रकल्पग्रस्त म्हणून मुलगा करण हा नवी मुंबई महापालिकेत नोकरीला होता. मात्र गेल्या वर्षी 8 मार्च रोजी त्याचा अपघाती मृत्यू झाला. मुलाच्या जागेवर मुलगी कल्पना हिला सरकारी नोकरी मिळावी यासाठी उघडा यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन विभागाकडे अर्ज केला. पण त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. मंगल उघडा यांनी अंबरनाथच्या बारवी धरण विभागात देखील कार्यकारी अभियंत्यांकडे नोकरीसाठी अर्ज केला. तरीही न्याय मिळाला नाही.
567 प्रकल्पबाधित नोकरीपासून वंचित
बारवी धरणामध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या अशा कुटुंबातील एका व्यक्तीला महानगरपालिकेत नोकरी देण्याचे आश्वासन सरकारकडून मिळाले होते. त्यापैकी काही जणांना नोकऱ्या मिळाल्या पण 567 प्रकल्पबाधित नोकरीपासून वंचित असल्याची बाब उघडकीस आली आहे. दरम्यान सरकारी अधिकाऱ्यांची मनमानी व दुर्लक्ष यामुळे अखेर उघडा दाम्पत्याने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. मुरबाड तालुक्यात संताप व्यक्त होत असून 15 जुलै रोजी तहसील कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा बारवी पीडित संघटनेचे अध्यक्ष कमलाकर भोईर यांनी दिला आहे.
– उघडा दाम्पत्याची घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याने मुलीला नोकरी द्या, असे आर्जव वारंवार करूनही एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या हृदयाला पाझर फुटला नाही.
– अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे अखेर मंगल उघडा व संगीता उघडा यांनी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. घरातील कमवता मुलगा दगावल्याने पती-पत्नीने मृत्यूला कवटाळले.
-या दाम्पत्याला उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटल मध्ये दाखल केले. उपचार सुरू असतानाच ४ जुलै रोजी मंगल यांचा तर त्यांची पत्नी संगीता यांचा सोमवारी रात्री उशिरा मृत्यू झाला.