
नोकरी करणारी व्यक्ती कधी ना कधी निवृत्त होते. मग ती खासगी नोकरी असो वा सरकारी. पण शिपायासारख्या पदावर काम करणारी व्यक्ती जेव्हा ३६ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होते तेव्हा अनेकांचे डोळे पाणावतात. मुरबाड तहसील कार्यालयातील तातू ठाकरे हा शिपाई निवृत्त झाला तेव्हा तहसीलदार अभिजित देशमुख यांनी त्याला स्वतःच्या खुर्चीत बसवून अनोखा गौरव केला.
मुरबाड तहसील कार्यालयात तातु ठाकरे हे ३६ वर्षे इमाने इतबारे काम करीत होते. १९८९ मध्ये ते नोकरीला लागले. १ मे रोजी कामगार दिनानिमित्त त्यांना निवृत्तीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानिमित्त आयोजित केलेला छोटेखानी सोहळा सर्वांच्याच कायम स्मरणात राहील. चतुर्थ वर्गातील कर्मचारी असूनही तहसीलदार अभिजित देशमुख यांनी ठाकरे यांना स्वतःच्या खुर्चीत बसवले तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. पत्नीसह ठाकरे यांचा गौरव करण्यात आला.
…आणि आनंदाश्रू वाहू लागले
तातु ठाकरे हे तहसील कार्यालयात काका म्हणून प्रसिद्ध होते. ३६ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात त्यांनी अनेक अधिकाऱ्यांबरोबर काम केले. यावेळी बोलताना तहसीलदार देशमुख म्हणाले की, शिक्षणाने पद, प्रतिष्ठा सहज मिळवता येते. पण संस्कार बाजारात मिळत नाहीत, ते रक्तात असावे लागतात. अत्यंत नम्र, प्रामाणिक व कामसू कर्मचारी म्हणून ठाकरे काका हे सर्वांचे लाडके होते. त्यांना देशमुख यांनी आपल्या खुर्चीत बसवले तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून वहात होते ते फक्त आनंदाश्रू.