पैशांच्या वाटणीच्या वाद; मित्राने केली मित्राचीच हत्या

569

काजू बियांच्या पैशांच्या वाटणीवरून मित्रानेच मित्राची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना देवरुख नजीकच्या आंबव येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री 9 च्या सुमारास आंबव कातळवाडीत घडली. या प्रकरणात संदीप विठ्ठल केदारी ( वय 43, रा. ओझरेखुर्द गवळवाडी) याचा मृत्यू झाला आहे.

देवरूख पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील मृत संदीप विठ्ठल केदारी आणि आरोपी संतोष शंकर घाटे, (रा. आंबव कातळवाडी) हे दोघे मित्र होते. गेले काही महिने ते एकत्रित काजू बियांचा व्यवसाय करत होते. त्यात पैशांची वाटणी करणे बाकी होते. शुक्रवारी रात्री 9 च्या सुमारास दोघांमध्ये आंबवमधील संतोषच्या घरच्या अंगणात चर्चा सुरू होती. यात पैशांच्या वाटणीवरून दोघांमध्ये वादावादी सुरू झाली. वादावादीचे पर्यवसन मारामारीत झाले. हाणामारी सुरू असतानाच रागात असलेल्या संतोषने संदीपच्या डोक्यात लोखंडी कोयत्याने तीन वार केले. त्यानंतर त्याने मानेशजारी एक वार केला. यात संतोष गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळयात पडलेल्या संदीपचा जागीच मृत्यू झाला. त्याला तातडीने देवरूख ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. हा प्रकार भर वस्तीत घडल्याने खळबळ उडाली.

उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल गायकवाड, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे शिरीष सासणे, साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक निशा जाधव, तुषार पाचपुते यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपी संतोष घाटे याला पोलिसांनी अटक करून खुनासाठी वापरण्यात आलेला कोयता जप्त केला आहे. संतोषवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या