
सामना ऑनलाईन । मुंबई
दुचाकी हळू चालविण्यास सांगितल्याच्या रागातून धारावीत एका तरुणाची दोघांनी जबर मारहाण करून हत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी धारावी पोलिसांनी दोघा आरोपींना बेडय़ा ठोकल्या आहेत. धारावीच्या 90 फिट रोडवरील कामराज युथ असोसिएशन मंडळ गणेशोत्सव मंडपासमोर विनोद देवेंद्र (29) हा रस्ता ओलांडत असताना दुचाकीवरून दोघे आले. तेव्हा विनोदने दोघांना दुचाकी हळू चालविण्यास बजावले. याचा राग आल्याने नागेश कोडम आणि शशी शेरखाने या दोघांनी विनोदला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. पोट, छाती व गुप्तांगावर जबर मारहाण झाल्याने त्यातच विनोदचा मृत्यू झाला. हा प्रकार कळताच धारावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नागेश आणि शशी या दोघांना अटक केली.


























































