
सामना प्रतिनिधी । जालना
जालना शहरातील संभाजीनगर रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या पाठीमागील मोकळ्या जागेत अट्टल गुन्हेगार दत्ता चंद्रभान उढाण (30, रा. चंदनझिरा, जालना) याचा धारधार शस्त्राने गळा चिरून खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. दरम्यान पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत दत्ता उढाण अट्टल गुन्हेगार होता. त्यांच्याविरूध्द अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत. 15 ऑक्टोबरला रात्री एका जागरणाच्या कार्यक्रमात त्याचे साथीदारासोबत भांडण झाले. त्यातून हा खून झाल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. औद्योगिक प्रशिक्षण केंद्र परिसरात एका युवकाचा मृतदेह असल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी शिलवंत ढवळे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी घटनास्थळी धाव घेवून, मृतदेहाची पाहणी केली. मयत दत्ता उढाण याचे शवविच्छेदन जालना जिल्हा रूग्णालयात करण्यात आले. त्यानंतर ते नातेवाईकांच्या हवाली करण्यात आले. या बाबत मयत दत्ता यांचे वडील चंद्रभान शेषराव उढाण (रा. चंदनझिरा जालना) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात मारेकऱ्याविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले करीत आहे.

























































