
खबरी बोलला म्हणून संतापलेल्या तरूणाने त्याच्या मित्राची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर मृतदेह एका गोदामात लपवला. त्याचा अतिनशेमुळे मृत्यू झाल्याचा बनावही करण्यात आला. चुनाभट्टी पोलिसांनी मृताचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला आणि या हत्येचा उलगडा झाला.
कुर्ला कुरेशीनगर येथील एका गोदामात रविवारी सकाळी मतीन नावाचा तरुण बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली होती. चुनाभट्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मतीनला रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्याआधीच डाँक्टरांनी मतीनला मृत घोषित केले. मतीनचा मृत्यू अतिनशेमुळे झाला असावा असे मतीनच्या कटुंबियांचेही म्हणणे होते. त्यामुळे कोणावरही संशय नसल्याचे म्हणत कुटूंबियांनी मृतदेह ताब्यात देण्याची विनंती केली. पण वरिष्ठ निरीक्षक दिपक पगारे यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला.
त्यात मतीनचा गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी कसून तपास केल्यावर रविवारी पहाटे मोईन शेख याने मतीनचा गळा आवळून त्याला ठार मारल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मोईन आणि शहनाज मोमीन यांनी मतीनचा मृतदेह शहनाजच्या गोदामात ठेवल्याचे उघड झाले. पोलिसांनी शहनाजला अटक केली असून मोईन फरार आहे. मतीन खबरी बोलला म्हणून मोईनला राग आला आणि रागाच्या भरात त्याने खास मित्र असलेल्या मतीनची हत्या केली होती. आरोपींनी शिताफिने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. पण चुनाभट्टी पोलिसांच्या योग्य निर्णयामुळे खुनाचा गुन्हा उघडकीस आला आणि आरोपींना गजाआड करण्यात आले.

























































