उमेदवारांची बिनविरोध निवड म्हणजे लोकशाहीची हत्या; नाना पटोले यांचे महायुतीवर टिकास्त्र

राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यात आता बिनविरोध निवडीवरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजप आणि शिंदे गटावर टिकास्त्र सोडले आहे. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना लोकशाही संपवायची आहे. ते लोकशाही मानत नाही. महायुतीचे तब्बल 67 उमेदवारांची बिनविरोध निवड म्हणजे लोकशाहीची हत्या आहे, अशा शब्दांत पटोले यांनी संताप व्यक्त केला.

भाजपने उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी जो डाव खेळला आहे, तो अत्यंत खालच्या पातळीचा आहे. पोलिसांचा दबाव वापरून आणि पैशांच्या मोठ्या ऑफर्स देऊन विरोधी उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडले जात आहे. अशा प्रकारे उमेदवारांची बिनविरोध निवड करत भाजपने लोकशाहीची हत्या केली आहे. असे प्रकार महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत याआधी कधीच घडले नव्हते. याकडे निवडणूक आयोग दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे भाजप निवडणूक आयोगाला खिशात घेऊन फिरत आहेत का? असा संतप्त सवाल पटोले यांनी केला.

सुरुवातीला निवडणूक आयोगाने या प्रकरणाची दखल घेत कारवाई करण्यार असे सांगितले. मात्र, अचानक आयोगाने आपला निर्णय बदलला आणि यू-टर्न घेतला. निवडणूक आयोग दबावाखाली काम करत आहे का? असा प्रश्न आता सामान्य जनतेला पडला आहे. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना लोकशाही मान्य नाही. जेव्हा सत्तेचा वापर करून निवडणुका मॅनेज केल्या जातात, त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. तसेच बिनविरोध निवड करत लोकशाहीची हत्या करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करावी, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली आहे.