
मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वडिलांनी 1500 रुपये खर्च केल्याने मुलाने रागाच्या भरात वडिलांची लोखंडी रॉडने हत्या केली आहे. घाव वर्मी लागल्याने वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ग्वाल्हेरच्या थाटीपूरमधील खलीफा कॉलनीत ही घटना बुधवारी घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपी मुलाला अटक केली आहे. त्याने चौकशीत दिलेल्या माहितीने पोलिसांनाही धक्का बसला. वडिलांनी 1500 रुपये खर्च केल्याने आपणच वडिलांची हत्या केल्याची कबुली मुलाने दिली आहे. आपण वडिलांकडे 1500 रुपये सांभाळून ठेवण्यासाठी दिले होते. ते आपल्यासाठी महत्त्वाचे असल्याने ते वडिलांकडे सुरक्षित राहतील, असा विचार करून आपण ते त्यांच्याकडे दिले होते.
आपल्याला पैशांची गरज भासल्यावर आपण ते त्यांच्याकडे मागितले. त्यावेळी त्यांनी ते 1500 रुपये खर्च केल्याचे सांगितले. त्यामुळे आपल्याला राग अनावर झाला आणि त्यांच्याशी आपली वादावादी झाली. तेव्हा रागाच्या भरात आपण त्यांच्या डोक्यात लोखडांच्या रॉडने वार केल्याचे मुलाने पोलिसांना सांगितले. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत मुलाला अटक केली असून त्याची चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.




























































