
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणात विशेष शोधपथकाला मोठं यश हाती लागलं आहे. पोलिसांनी गौरी लंकेश यांच्यावर गोळी झाडणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मुख्य आरोपीला पकडण्यात आलं असून या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक झाली आहे.
परशुराम असं या आरोपीचं नाव असून परशुरामला याआधी अवैधरित्या हत्यार पुरवठा केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा अधिक तपास करतेवेळी परशुरामने गौरी यांना मारल्याची कबुली दिली. परशुराम याच्या म्हणण्यानुसार, तो अन्य एका साथीदारासोबत बाईकने आला. त्यानेच गौरी यांच्यावर गोळ्या झाडल्या.
काही दिवसांपूर्वी गौरी लंकेश आणि प्रसिद्ध लेखक एम. कलबुर्गी यांची हत्या एकाच बंदुकीने झाली असल्याचा अहवाल आला होता. त्यामुळे आता परशुरामकडून कलबुर्गी प्रकरणातही खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
























































