महापौर असताना मोहोळ बिल्डरची गाडी वापरायचे, रवींद्र धंगेकरांचा खळबळजनक आरोप

मुरलीधर मोहोळ हे खासदार होण्यापूर्वी महापौर होते. हे पद सांभाळत असताना ते महापौर पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा वापरत होते. ही गाडी त्यांच्या स्वत:ची ना महापालिकेची अधिकृत गाडी होती. तर ती कोथरूडच्या बढेकर बिल्डरची होती. हा बिल्डर जैन होस्टेल खरेदी प्रकरणाशी संबंधित असून मोहोळ यांचे व्यावसायिक संबंध या बिल्डरशी असल्याचे देखील आढळते. याबाबत गाडीचे आणि मालकीचे फोटो पोस्ट करत मिंधे गटाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी मोहोळ यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे.

याबाबत धंगेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मोहळावर आरोप केले आहेत. धंगेकर म्हणाले, कोथरूड भागात मोठय़ा प्रमाणात सोसायटीचे पुनर्विकास प्रकल्प बढेकर बिल्डरला देण्यात आलेले आहेत. वेताळ टेकडी येथे टनेल, एचसीएमटीआर रस्ता आणि बालभारती ते पौड फाटा लिंक रोड हा प्रोजेक्ट आणण्यासाठी माननीय इतके अतिउत्साही  आहेत, त्यांनी हजारो पर्यावरणवाद्यांचा विरोध पत्करला, असा घणाघातही धंगेकर यांनी केला.

मोहोळांच्या काळात पालिकेत भ्रष्टाचार बोकाळला

पुण्याच्या विकासात अनेक महापौरांनी योगदान दिले, परंतु विद्यमान खासदारांच्या काळात महापालिका अतिशय भ्रष्टाचारग्रस्त झाली. सामान्य एक वर्षाच्या टेंडर प्रणालीला बदलून 5 वर्षांपासून 10, 15, 20 वर्षांचे टेंडर दिले गेले, ज्यामुळे महापालिकेची कार्यप्रणाली दुरवस्थेत पोहोचली. जैन बोर्डिंग प्रकरणातील व्यवहार रद्द करून दोषींवर तत्काळ कारवाई होणे आवश्यक आहे, अशी मागणीही धंगेकर यांनी केली.

मोहोळ म्हणतात धंगेकरांबद्दल आता मला बोलायचं नाही

बढेकर प्रॉपर्टीजमध्ये पार्टनर असल्याचे लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट दिले होते. त्या पार्टनरशिप मधली माझी गाडी मी वापरली. याचा पुणेकरांना अभिमान वाटायला हवा. आता हे शेवटचं स्पष्टीकरण असून यापुढे मला धंगेकरांबद्दल काही बोलायचे अथवा उत्तर द्यायचं नाही.