शेखांच्या देशात मुरुडच्या कन्येचा बोलबाला, शीतल दांडेकरच्या चित्रांवर अरबांच्या पसंतीची मोहर

मुरुडची कन्या शीतल दांडेकर हिने तिच्यातील कलेने कत्तार गाजवले असून तिने जादुई ब्रशमधून साकारलेल्या चित्रांवर अरबांनी पसंतीची मोहोर उमटवली. कत्तारच्या दोहा येथील सौक वकिफ आर्ट सेंटरमध्ये शीतलच्या ऑईल पेंट, वॉटर कलरच्या रंगसंगतीतून विविधांगी चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाला अरब नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि तिचे तोंड भरून कौतुक केले.

विविध रंगछटांमधून चित्रांना जिवंतपणा आणण्यात चित्रकार शीतलचा हातखंडा आहे. शीतल ही मूळची जंजिरा-मुरुडची आहे. सर एस. ए. हायस्कूलमध्ये शालान्त परीक्षेनंतर रांगोळीकार कलाशिक्षक महेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तिने जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून पदवी प्राप्त केली. विवाहानंतर ती कत्तार येथील दोहा या ठिकाणी वास्तव्यास आहे. कॅनव्हासवर वॉटर कलरच्या माध्यमातून रेखाटलेली 17 निसर्गचित्रे दोहा येथील सौक वकिफ आर्ट सेंटरमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहेत. या चित्र प्रदर्शनाचे अनावरण मुरुडचे कलाशिक्षक महेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुधाकर दांडेकर, पीडी डेव्हपर्सचे आदेश दांडेकर, माजी नगरसेवक मनोज भगत, नितीन पवार, मेघराज जाधव, हेमकांत चिटणीस, प्रशासन अधिकारी दीपाली दिवेकर, अशोक विरकुड, आसावरी विरकुड, उदय दांडेकर, अजित कासार आदी उपस्थित होते. आसावरी विरकुड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

जे असावे नेत्री ते दिसावे चित्री. शीतलने कत्तारसारख्या ठिकाणी चित्रप्रदर्शन भरवून दाद मिळवली याचा सार्थ अभिमान आहे. आता मुरुड या निसर्गनगरीत आर्ट अ‍ॅकॅडमी सुरू करण्याचा मानस आहे. – महेंद्र पाटील, कलाशिक्षक