मुरूडमध्ये युवकाची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून तीन ठिकाणी फेकले

5523

गेल्या सात दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील मुरूड येथून बेपत्ता झालेल्या कृष्णा बबन पांचाळ (20) या तरुणाचा शोध लागला असून त्याची निर्घृण हत्या झाल्याचं उघड झालं आहे. हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून त तीन ठिकाणी फेकून देण्यात आल्याचंही निदर्शनास आलं आहे.

यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, मुरुड शहरामध्ये दत्तनगर भागात राहत असलेला कृष्णा हा तरूण 8 नोव्हेंबरपासून बेपत्ता झाला असल्याचे उघडकीस झाले होते. मुरुड शहरामध्ये आंबेडकर चौकात असलेले सचिन ऑटोमोबाईल्स दुकानांमध्ये मागील काही वर्षापासून कृष्णा पांचाळ कामास होता. परंतु तो अचानक गायब झाल्यामुळे कृष्णाच्या मुरुड येथील नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये हरवल्याची तक्रार दाखल केली होती .कृष्णाचे दुकान मालक सचिन गायकवाड याच्यावर संशय असल्याचं नातेवाईकांनी पोलिसांना सांगितलं होतं. त्या अनुषंगाने पोलिसांनी खाकी वर्दीचा हिसका दाखवला असता सचिन गायकवाड याने कृष्णाची हत्या केल्याची कबुली दिली. या प्रकरणामुळे मुरुड परिसरात खळबळ उडाली आहे.

कृष्णाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेहाचे तीन तुकडे करण्यात आले. दोरीने गळा आवळून त्याची हत्या केल्यानंतर कोयत्याने शरीराचे हात पायाचे तुकडे करून वेगवेगळ्या शिवारामध्ये नेऊन टाकले होते. कृष्णा पांचाळ याला आधी मुरुड येथील दुकानामध्ये आणि त्यानंतर तेर व येरमाळा या दोन ठिकाणी नेण्यात आलं. तिन्ही ठिकाणी त्याला दारू पाजण्यात आली. त्यानंतर त्याची निर्घृण हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्या शरीराचे तुकडे केले व ते वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन दडवून ठेवण्यात आल्याचं या तपासात उघड झालं आहे.

या प्रकरणात पाच जणांचा समावेश असून सचिन शिवाजी गायकवाड (35, रा. गुंफावाडी), संदीप गायकवाड (रा. गुंफावाडी), शुभम इंगळे, आकाश शिंदे, संदीप समुद्रे (तिघे रा. मुरुड) अशा पाच आरोपींचा समावेश आहे. नवीन दुकानाच्या कारणावरून हा प्रकार घडल्याचे तपासात उघड झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या