
अरुण मळेकर
स्वातंत्र्याची पहाट होताना हिंदुस्थानी चित्रपट समाज प्रबोधन करण्याबरोबर काहीतरी संदेश देणारा आदर्शवादी होत होता. चित्रपटाचा आत्मा ठरलेल्या संगीतानेही कात टाकायला सुरुवात केली. अनिल विश्वास, खेमचंद्र, प्रकाश आर. सी. बोराल, नौशाद, के. दत्ता या बुजुर्ग मंडळींकडे त्याचे श्रेय निश्चितच जाते. पं. हुस्नलाल भगतराम या संगीतकारांच्या पहिल्या जोडीने चित्रपट संगीताचा पारंपरिक ढाचाच बदलून टाकला. पण 1949 मध्ये उगम पावलेल्या असामान्य प्रतिभेच्या शंकर-जयकिशन या जोडीच्या जबरदस्त झंझावातासमोर ही जोडी मागे पडली. नंतर एकसे एक निर्माण झालेले संगीतकार त्यांच्या प्रांतातील लोकसंगीतासह स्वयंभू प्रतिभेने त्यांच्या हयातीतच दंतकथा बनून गेले. या झंझावातात मोजक्याच चित्रपट संगीताने आपली अंगभूत कलाकृती पेश करणाऱया सज्जाद हुसेन, चित्रगुप्त, दत्ताराम, विनोद, एस. मोहिंदर यांच्या रांगेतील जयदेव यांचेही नाव घ्यावे लागते. कारण मोजकी, पण भावमधूर स्वरसाज चढणारे संगीतकार म्हणून त्यांची ख्याती कायम आहे.
आफ्रिकेतील नैरोबी भूमीवर त्यांचा जन्म झाला. तो दिवस होता 3 ऑगस्ट 1919. इंग्रज राजवटीत नोकरदार वडील नैरोबी मुक्कामी स्टेशन मास्तर म्हणून कार्यरत होते, तर परकीय भूमीवरही बाळबोध आईच्या आवाजाचा प्रभाव त्यांच्यावर संस्कारक्षम वयातच झाला. धार्मिक प्रवृत्तीच्या देवभोळय़ा आईच्या सुमधूर भावपूर्ण रामायण पठणाचा प्रभावही त्यांच्यावर बालपणीच झाला.
परकीय भूमीवर संस्कारांसह पुढील शिक्षण होणे शक्य नसल्याने बालपणीच जयदेव यांची रवानगी पंजाबातील लुधियाना मुक्कामी झाली. पारंपरिक शालेय शिक्षणात त्यांना स्वारस्यच नसल्याने गतीही नव्हती. तेव्हा पाटी पेन्सिल हाती घेण्याच्या वयातच त्यांनी माऊथ ऑर्गन वाजवायला सुरुवात केली. पुरोगामी आईवडिलांनी आपल्या चिरंजीवाची अभिरुची जाणून पं. विष्णू दिगंबर पलुस्कर संचालित संगीत विद्यालयात त्यांना भरती केलं. तेथेच त्यांनी सरदार मोहन सिंगाची शागिर्दी करून नावलौकिक वाढवला.
‘‘हा तुमचा मुलगा संगीत क्षेत्रातच आपलं नाव काढेल’’ हे यापूर्वीच भविष्यकारांनी वर्तवले होते. आपल्या संगीत साधनेत शास्त्रोक्त बैठक हवीच याची जाणीव त्यांना उमेदवारीच्या काळातच झाली होती. जयदेव यांनी चित्रपट बोलायला लागला तेव्हाच एक चित्रपट बघितल्यावर याच क्षेत्रात नावलौकिक मिळवायचा हे निश्चित करून टाकले. आपल्या उपजत ओढीने अन्य संगीतकारांप्रमाणे भवितव्य घडवण्यासाठी मुंबई महानगरीची वाट धरली. प्रारंभी ते अपयशासह अनेक ठिकाणी उपेक्षेचे धनीही ठरले. शैक्षणिक आणि आर्थिक पाठबळ नाही, कुणाचा आधार व मार्गदर्शन नाही अशा एकाकी अवस्थेत चित्रपट निर्मितीच्या अनेक संस्थांचे दरवाजे त्यांनी वारंवार ठोठावले. अखेर ‘वाडिया मूव्हीटोन’ या चलती असलेल्या चित्रपट निर्मितीच्या संस्थेत उमेदवारीच्या अटीवर त्यांना काम करण्याची संधी मिळाली. उपजत संगीताची ओढ बाजूला ठेवून या संस्थेत गायक अभिनेता म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली. ‘वामन अवतार’ आणि फिअरलेस नादियाच्या ‘हंटरवाली’ या चित्रपटात अलक्षित भूमिका त्यांच्या वाटय़ाला आल्या, पण चित्रपटाच्या छायाचित्रणाचे प्रखर प्रकाशझोत त्यांच्या डोळय़ांना सहन होईनात म्हणून त्यांना इच्छेविरुद्ध लुधियानाची वाट धरावी लागली. त्या काळातील संगीताची विद्यानगरी लखनौ, अलमोरा इ. ठिकाणी त्यांनी संगीताचा जीव तोडून रियाझ केला. अली अकबर खां यांच्याकडे सरोद वादनही आत्मसात केले.
चित्रपटातील भूमिका करणं हे क्षेत्र आपल्यासाठी नाही याची जाणीव झाल्यावर ते मुंबई महानगरीशी संपर्क ठेवून होतेच. पन्नास-साठच्या दशकातील एस. डी. ऊर्फ सचिनदा या बुजुर्ग संगीतकाराने त्यांना मुंबईत पाचारण केलं. हा त्यांच्या धडपडीच्या आयुष्यातील सुयोगच होता. एस.डींच्या परीस स्पर्शाने गाजलेल्या ‘टॅक्सी ड्रायव्हर’ या चित्रपटाला संगीत देताना जयदेवना त्यांचे सहायक म्हणून काम करण्याची संधी लाभली. ही त्यांच्या भविष्यातील उज्ज्वल कारकीर्दीची नांदीच होती. एसडींकडे खूप काही शिकता-शिकता आपल्याही पंखात बळ आहे या जाणिवेने त्यांनी स्वतंत्रपणे चित्रपटांना संगीत द्यायला सुरुवात केली.
अंजली, जोरू का भाई, किनारा-किनारा हेच ते जयदेव यांनी स्वरसाज चढवलेले प्रारंभीचे चित्रपट. समकालीन संगीतकार चित्रगुप्त यांच्या ‘भाभी’ या चित्रपटाने जशी त्यांना एक नवीन ओळख होऊन कलाटणी दिली तसा ‘हम दोनो’, ‘मुझे जीने दो’ या जयदेव यांनी स्वरबद्ध केलेल्या चित्रपटांनी त्यांचं नाव देशभर झालं. ‘हम दोनो’मधील ‘अभी ना जाओ छोडकर’ आणि ‘मुझे जीने दो’मधील ‘नदी नाले ना जाओ श्याम पैया पडू’ ही दोन गीते आजही लोकांच्या स्मरणात आहेत. कमीत कमी वाद्यांचा उपयोग करून प्रसंगानुरूप दिलेलं संगीत ही जयदेव यांची खासीयत यातून व्यक्त होते.
जयदेव यांनी प्रारंभीच्या काळात दुरियां, आलिंगन, आलाप, कभी-कभी, तुम्हारे लिये, घरौंदा या चित्रपटांतील गीतांना संगीत देताना वेगवेगळे प्रयोग करून नाव मिळवलं. जयदेवना कवितेची आवड होतीच. हरिवंशराय बच्चन, दिनकर, जयशंकर प्रसाद, महादेवी वर्मा, धर्मभारती या नामवंत कवींच्या अजरामर गीतरचनांना सुमधूर चाली देऊन त्या जनमानसात लोकप्रिय केल्या. अशा गुणवंत कलाकारांना प्रसिद्धीच्या झोतात आणण्यात जयदेव यांची नेहमीच शोधक नजर असायची. नावीन्यपूर्ण आवाजाचे कलाकार शोधणे आणि त्यांना दिशादर्शन करून घडवताना संगीतात अनोखे प्रयोग करण्यात जयदेव वाकबदार होते.
समाजमनाची पकड घेणारं साधंसुधं पण सुरांचे बारकावे असलेलं संगीत देण्यात जयदेव यांचा हातखंडा होता. संगीत साज चढवताना वाद्यांचा मेळ साधून गीतरचनेतील शब्दांच्या सामर्थ्यालाही त्यांनी न्याय दिलाय. अशा प्रकारचे संगीत त्यांना सहजतेने सुचत असे. ‘अल्ला तेरो नाम’, ‘सिने मे जलन’ यांसारख्या रचना आजही सिने संगीताच्या कानसेनांच्या स्मरणात आहेत. जयदेव यांचा दादरा या राग, तालावर जास्त ओढा होता. तो सुगम शास्त्रीय संगीताला खूप आधारभूत आहे हे ते जाणून होते. काही गीतांतील भाव-भावनांची पकड घेण्यासाठी त्यांनी दादरा रागाचा आधार घेतलाय. एकूणच आपल्या दिलखेच संगीत यात्रेत अनेक प्रासादिक रचना पेश करताना जयदेव यांच्या सुमधूर चाली शब्दांवर कुरघोडी करणाऱया वाटत नाहीत.
आजच्या संकल्पनाच बदललेल्या जमान्यातही जयदेव यांनी आपल्या प्रकृतीला मानवेल अशाच गीतरचनांचं सादरीकरण केलंय. बदलत्या काळातही त्यांनी कधीही बाजारू, गल्लाभरू प्रवाहाची कास धरली नाही.
सज्जाद हुसेन यांच्याप्रमाणे जयदेव यांनी मोजक्याच चित्रपटांना संगीत देऊनही ते त्यांच्या समकालीनात मशहूर संगीतकार झाले याचं कारण स्वयंभू जयदेव यांनी स्वतःची शैली विकसित करून गीतरचनांना स्वरसाज चढवताना अगदी मोजक्याच वाद्यांचा वापर केलाय. प्रसंगी पाश्चात्त्य संगीताचा वापर त्यांनी केला खरा, पण त्यांचा खरा भर हिंदुस्थानी वाद्यांवरच होता.
फिल्मी दुनियेत स्थिरावल्यावरही जयदेव यांनी प्रसिद्धीचा हव्यास धरून सवंग लोकप्रियता कटाक्षाने टाळली. म्हणूनच आपल्या धारणेशी इमान राखणारा एक शांत प्रकृतीचा, अभ्यासू संगीतकार म्हणून त्यांची प्रतिमा कायम राहिली. प्रतिभावान साहिर लुधियानवी हा कविराज जयदेव यांना लाभला. कविमनाच्या संवेदनशील जयदेव यांनी साहिरला अभिप्रेत असलेल्या भाव-भावना आपल्या अजोड संगीतातून जनमानसात पोचवण्याचे अनमोल काम करताना आपली संवेदनशीलता दाखवलीय.
संगीत यात्रेत एकाकी, क्रतस्थपणे काम करणाऱया जयदेव वर्मा या संगीतकाराची सरकार दरबारी अल्पशी दखल घेऊन ते पुरस्कारांचे मानकरी ठरले. ही एक जमेची बाजू. हम दोनो (1961), गमन (1979), अनकही (1985) या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार लाभला. चित्रपट संगीतातील बदलत्या संकल्पना प्रवाहाची कल्पना आल्यावर ‘आलाप’, ‘किनारे-किनारे’ या चित्रपटांबरोबर ‘मौतीघर’ या नेपाळी चित्रपटाला संगीत दिल्यावर सत्तरीच्या उंबरठय़ावर असताना दूरचित्रवाणीवरील ‘रामायण’ या मालिकेसाठी संगीत देऊन राजीखुशीने चित्रपटाच्या दुनियेपासून त्यांनी दूर राहणे पसंत केले तरी जयदेव आजही लोकांच्या स्मरणात आहेत.





























































