पेन्शनचा पहिला धनादेश सिद्धिविनायक चरणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

एका मुस्लिम बांधवाने आपल्या पेन्शनचा पहिला धनादेश मंगळवारी सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण केला. गिरणी कामगारांच्या संपात वडिलांची नोकरी गेली. त्यानंतर सिद्धिविनायकानेच मार्ग दाखवला आणि पोटापाण्याचे साधन मिळाले. त्याच्याच आशीर्वादाने मला सरकारी नोकरी मिळाली. त्यामुळे यापुढेही त्याच्या सेवेत माझ्याकडून काहीही कमी होणार नाही, अशा शब्दांत या बांधवाने भावना व्यक्त केल्या.

हमीद नाईक असे त्या मुस्लिम बांधवाचे नाव. आरटीओ कार्यालयातून 31 मे 2018 रोजी आपली 33 वर्षांची सेवा संपवून निवृत्त झालेले हमीद नाईक 1982 पासून सिद्धिविनायकाच्या दर्शनाला दर मंगळवारी न चुकता जातात. क्रॉफर्ड मार्केटच्या मारुतीरायाच्या चरणीही ते दर शनिवारी माथा टेकतात. त्यांचे वडील गिरणी कामगार होते. 1982 साली कामगारांच्या संपात त्यांची नोकरी गेली. त्यानंतर घरात कमावणारे कुणीच नव्हते, परंतु 1985 रोजी अचानक त्यांना आरटीओ कार्यालयातून कॉल आला. सरकारी नोकरी मिळाली. लिपिक पदावर ते रुजू झाले. त्यानतंर त्यांचे आयुष्यच बदलले.

मात्र इतक्या वर्षांत त्यांनी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाणे कधीच सोडले नाही असे हमीद यांनी सांगितले. अल्लाही माझाच आहे आणि बाप्पाही. मी जितका मुस्लिम आहे तितकीच माझी श्रद्धा सिद्धिविनायक आणि हनुमंतावरही आहे असे नाईक सांगतात. शिर्डीच्या साईबाबांच्या चरणीही ते माथा टेकण्यासाठी जातात. हिंदू देवदेवतांवरही इतकी गाढ श्रद्धा असणाऱ्या हमीद नाईक यांनी आज सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्याकडे 14 हजार 448 रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी सेवानिवृत्त कर वसूल अधिकारी बाळ धुरी, सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक रवी पाटील आणि परिवहन आयुक्त कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक अभय वर्तक उपस्थित होते.

1992-93च्या दंगलीत हिंदूंनी आधार दिला
माझे वडील बॉम्बे डाईंगमध्ये गिरणी कामगार होते. आम्ही सनमिल कंपाऊंड येथे राहायचो. कामगार नेते दत्ताजी नलावडे यांचे आमच्या घरी येणेजाणे असायचे. 1992-93 ला जेव्हा हिंदू-मुस्लिम दंगल उसळली त्यावेळी कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. दत्ताजी नलावडे यांनी आम्हाला धीरच दिला. तुझ्या घरातला एक चमचाही बाहेर जाणार नाही, आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी आहोत असे ते म्हणाले. त्यामुळे मी स्वत:ला महाराष्ट्रातल्या मातीचा आणि मराठीच समजतो. माझे आणि वडिलांचे संपूर्ण शिक्षण मराठीतूनच झाले. रत्नागिरीत माझे गाव आहे, असे हमीद नाईक यांनी सांगितले.