
जर दररोज घुंघट, बांगडय़ा, पगडी, क्रॉस आणि टिकली अशी शेकडो धार्मिक प्रतिके परिधान केली जातात, मग केवळ हिजाबलाच विरोध का केला जातो, असा सवाल बुधवारी कर्नाटक उच्च न्यायालयात उपस्थित करण्यात आला. उडुपीच्या कॉलेजमधील हिजाब वादाची बुधवारी सलग चौथ्या दिवशी सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्या मुस्लिम मुलींच्यावतीने ऍड. रवी वर्मा कुमार यांनी हा युक्तिवाद केला.
कर्नाटकात कॉलेजमध्ये हिजाब परिधान करण्यावरून वादाला तोंड फुटले आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटक उच्च न्यायालयाने याचा अंतिम निकाल देईपर्यंत हिजाब परिधान करण्यास बंदी घातली आहे. या निर्णयाला आव्हान देणाऱया मुस्लिम विद्यार्थिनींचा युक्तीवाद बुधवारी मुख्य न्यायमूर्तींनी ऐकून घेतला. सरकार केवळ हिजाबच्या बाबतीत भेदभाव का करते? शाळा- कॉलेजमध्ये मुली बांगडय़ा घालतात? ते धार्मिक प्रतीक नाही का? तुम्ही या गरीब मुस्लिम मुलींनाच का टार्गेट करता असा सवाल ऍड. रवी कुमार यांनी केला.
z हिजाब परिधान करणाऱया मुस्लिम मुलींना शाळा, महाविद्यालयांत प्रवेश नाकारला जाणे म्हणजे संवैधानिक हक्कांचे उल्लंघन आहे. या उल्लंघनाचा तीव्र निषेध करीत 500 हून अधिक लॉ स्टुडंट्स, कायदेतज्ञ आणि वकिलांनी एक खुले पत्र लिहिले आहे.




























































