
हवामानातील बदलामुळे अनियमीत पाऊस, निसर्गसारखी वादळे अशी संकटे निर्माण झालेली आहेत. त्यामुळे पर्यावरण रक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणूनच सर्वांच्या एकत्रित सहभागातून माझी वसुंधरा अभियान प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज केले.
पर्यावरणाच्या रक्षणासाठी राज्यात माझी वसुंधरा मोहिम सुरु केली आहे.या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी पुणे व कोकणातील आढावा घेतला. आदित्य ठाकरे यांनी दोन्ही विभागातील आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली.
आज, महाराष्ट्रात वातावरणीय बदल कमी करण्यासाठी सुरू असलेल्या “माझी वसुंधरा” या अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. या अभियानासाठी गेला महिनाभर पुणे व कोकण विभागातील अधिकाऱ्यांनी घेतलेली मेहनत नक्कीच कौतुकास्पद आहे. pic.twitter.com/zPxDgZrvZK
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 2, 2020
पर्यावरणाच्या रक्षणासाठी येत्या काळात ‘माझी वसुंधरा’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, त्याची सुरुवात शासकीय कार्यालयातून करावी त्यासाठी शासकीय कार्यालयांतील ऊर्जा व पाण्याचा वापर, पाण्यायचे ऑडिट, अडगळीतील सामानाचे व्यवस्थापन, कार्यालयाच्या परिसरातील वृक्षसंपदा यावर काम करावे. सर्वांनी प्राधान्याने या अभियानाचा समावेश करावा असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले
पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर म्हणाल्या की, स्वच्छता अभियान, जलसंधारण, सौरऊर्जा अशा विविध योजनांच्या अभिसरणातून विविध उपक्रम राबवून ‘माझी वसुंधरा’ अभियानाला गती द्यावी.
अभियानात काय होणार
स्वच्छता, जैवविविधता जपणार, हरितपट्टे तयार केले जाणार, कचऱ्य़ाचे विलगीकरण, सायकल ट्रकची उभारणी, देशी झाडांचे रोपण., अर्बन फॉरेस्ट, सायकल शेअरिंग, मियावाकी पद्धतीने वृक्षापरोपण, कांदळवनांचे जतन व संवर्धन, शहरातील धुळीचे प्रमाण कमी करणार, गृहनिर्माण सोसायटय़ांमधील कचऱ्य़ाचे व्यवस्थापन, नदी व तलावांचे आणि नाल्यांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे.

























































