हा छंद जिवाला लावी पिसे – माय फिटनेस फंडा

>> देवदत्त नागे, अभिनेता

फिटनेस म्हणजे : शरीर हे एक मंदिर आहे आणि त्या मंदिरात आपण नेहमी शुचिर्भूतच राहतो. तसेच आपलं शरीर शुचिर्भूत ठेवले तर आपण तंदुरुस्तच राहतो आणि तोच फिटनेस आहे.

डाएट की जीवनशैली : डाएटयुक्त जीवनशैली जास्त आवडेल.

सामान्य माणसासाठी फिटनेस : सामान्य माणसाने सुरुवातीला स्वतःच्या हृदयाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्याकडे लक्ष दिले की त्यांचा फिटनेस चांगलाच राहील. त्यासाठी त्याने निदान दोन मिनिटं तरी स्टेशनरी जॉगिंग करणे गरजेचे आहे, स्ट्रेचिंग, सूर्यनमस्कार, योगा, बैठका करणे गरजेचे आहे.

व्यायाम कसा करावा – तुमच्या शरीराला कोणता व्यायाम पुरक आहे, गरजेचा आहे तो व्यायाम जाणून घ्या आणि करा.  ते केलं ना की व्यायाम परफेक्ट होतो.

व्यायाम आणि डाएट समतोल कसा राखता : व्यायाम, डाएटबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरेसा आराम. सध्याच्या जीवनपद्धतीनुसार २० टक्के व्यायाम, २० टक्के आराम आणि ६० टक्के डाएट असा असायला हवा.

व्यायामाला किती वेळ देता? : सकाळ-संध्याकाळ असा दिवसभराचा दोन अडीच तास व्यायाम होतो.

जिमला जायला न मिळाल्यास…? : सायकलिंग. माझी आवडती गोष्ट. सरळ सायकल घेतो घराजवळ बिच आहे तिथे मी आणि माझा बच्चू निहार दोघंही सायकलिंग करतो.

बाहेर गेल्यावर डाएट कसा सांभाळता? : बाहेर गेल्यावर माझ्यासोबत प्रोटीन शेक घेतो. फळं खातो. रेस्टॉरंस्टमध्ये गेल्यावर आवर्जून तिथे तिखट, तेलकट, मसालेदार खाणं टाळतो. पण प्रयत्न करूनही चहा टाळू शकत नाही.

कोणता पदार्थ नियमित खाता? : ब्राऊन भात मला प्रचंड आवडतो. पोळी, भाजी, वरण, भात असं घरगुती जेवण मी  खातो. हेवी वर्क करत असाल तर ताकद असायला हवी म्हणून ब्राऊन राईस खातो. शिवाय तो पचायला हलका असतो.

फिटनेसबाबत अपडेट करण्यासाठी? : माझं वाचन प्रचंड आहे. इंटरनेटवरही मी अनेकांना फॉलो करतो. संग्राम चौघुले माझा जवळचा मित्र आहे. आम्ही दोघं फिटनेसवर चर्चा करत असतो.

फिटनेस मंत्र : व्यसनांपासून दूर राहा. मद्य, सिगारेटचे व्यसन नसावे. व्यसन करायचेच तर व्यायामाचे व्यसन लावून घ्या.