हिंदुस्थान- म्यानमार सीमा सर्वांसाठी खुली; विशेष परमीटची गरज नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थान- म्यानमारला जोडणारा इंडो- म्यानमार ‘मैत्री पूल’ वापरासाठी म्यानमारने खुला केला आहे. मणीपूर सीमेजवळील मोरेह शहरातून जाणारा हा पूल खुला झाल्याने म्यानमारमध्ये जाणाऱ्या हिंदुस्थानींना आता विशेष परमीटची गरज भासणार नाही. म्यानमारमधील तामू येथे झालेल्या एका कार्यक्रमात हा पूल खुला करण्यात आला. ही सीमा खुली झाल्याने दोन्ही देशातील मैत्रीपर्वाचा नवा अध्याय सुरू होणार आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज ११ मे रोजी म्यानमार दौऱ्यावर असताना दोन्ही देशातील ही सीमा खुली करण्याबाबत करार झाला होता.

तामू- मोरेह या सीमेसह हिंदुस्थान म्यानमार सीमेजवळील चीन प्रातांतील रिखावदार आणि मिझोरामच्या जोखावतार या सीमाही खुल्या करण्यात आल्या आहेत. या सीमा खुल्या झाल्याने दोन्ही देशांचे नागरिक विनापरवाना एकमेकांच्या देशात १६ किलोमीटरपर्यंत प्रवास करु शकणार आहेत. रस्तेमार्गाने जोडण्यासाठी आणि संपर्क वाढवण्यासाठी दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यासाठी दोन मोठ्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. तसेच ६९ पूलांच्या नुतनीकरणाचे काम २०२० पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या मार्गांमुळे म्यानमारशी असलेले हिंदुस्थानचे संबंध सुधारणार आहेत. म्यानमारशी हिंदुस्थानची १,६४० किलोमीटर लांबीची सीमा जोडलेली आहे. नक्षलग्रस्त नागालँड आणि मणीपूरची सीमा म्यानमारला जोडलेली आहे. त्यामुळे म्यानमारशी मैत्री हिंदुस्थानला महत्वाची आहे.

हिंदुस्थान -म्यानमार- थायलंड या त्रिपक्षीय आंतरराष्ट्रीय राजमार्गासाठी तिन्ही देश एकत्र काम करत आहेत. सुमारे १४०० किलोमीटरच्या या राजमार्गाचे काम २०१९पर्यंत पूर्ण होणार आहेत. त्यामुळे तिन्ही देशात व्यापार, आरोग्य, शिक्षण आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे. तसेच या देशांशी सहकार्य वाढल्यामुळे चीनचा वाढता प्रभाव रोखणे शक्य होणार आहे.