नागालँडच्या पर्वतांमध्ये आढळला रहस्यमय बिबट्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागालँडच्या पर्वतांमध्ये एक दुर्मिळ प्राणी सापडला आहे. हा प्राणी याआधी तिथे कधीच दिसला नव्हता. हा प्राणी म्हणजे क्लाऊडेड लेपर्ड असून त्याचा पहिल्यांदाच सुगावा लागला आहे. बिग कॅट्स कुटुंबातील ही प्रजाती फारच दुर्मिळ आहे.

संशोधकांच्या पथकाने नागालँडमधील इंडो-म्यानमार सीमेवरील जंगलात 3,700 मीटर उंचीवर क्लाऊडेड बिबटय़ा लपल्याचे फोटोग्राफिक पुरावे गोळा केले आहेत. क्लाऊडेड बिबटय़ा झाडावर चढण्यात तरबेज असतो. छोटे आणि मजबूत पाय यामुळे तो झाडावर नुसता चढत नाही तर मोठे पंजा आणि तीक्ष्ण नखांनी झाडांवर लोंबकळूही शकतो. हा मुख्यत्वे झाडावर राहणे पसंत करतो. जाड शेपटीमुळे त्याला झाडावर तोल सांभाळणे सोपे जाते. क्लाऊडेड बिपटय़ा जमिनीवर शिकार करतो. हरणं, डुकरे, माकड, खार, पक्षी आदींना आपले भक्ष्य बनवतो. या बिबटय़ाच्या शरीरावर ठिपक्यांऐवजी मोठे ब्लॉक असतात.

दिल्लीतील नॉन-प्रॉफिट वाइल्डलाइफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी पूर्व नागालँडमधील किफिरे जिल्ह्यातील थानामीर गावातील जंगलात 65 चौरस किलोमीटर वनक्षेत्रात संशोधन केले. त्यासाठी जानेवारी ते जून 2020 दरम्यान जंगलात 37 कॅमेऱ्यांचे सापळे लावले होते. याबाबतचे संशोधन द कॅट न्यूजच्या ताज्या अंकात प्रसिद्ध झाले आहे.