
कर्णधार केन विल्यमसनच्या 24व्या शानदार कसोटी शतकाच्या जोरावर यजमान न्यूझीलंडने दुसऱया कसोटीच्या दुसऱया दिवशी 3 बाद 286 धावा फटकावल्या. आता त्यांचा संघ पाकिस्तानने पहिल्या डावात केलेल्या 297 धावांपेक्षा फक्त 11 धावांनीच पिछाडीवर आहे. केन विल्यमसन 112 धावांवर तर हेन्री निकोल्स 89 धावांवर खेळत आहे.
पाकिस्तानचा पहिला डाव पहिल्या दिवशी 297 धावांमध्येच संपुष्टात आला. न्यूझीलंडने सोमवारी कसोटीच्या दुसऱया दिवशी पहिल्या डावाला सुरुवात केली. पण शाहीन शाह, आफ्रिदी, मोहम्मद अब्बास व फहीम अश्रफ यांच्या प्रभावी गोलंदाजीसमोर न्यूझीलंडची अवस्था 3 बाद 71 धावा अशी झाली. टॉम लॅथम 33 धावांवर, टॉम ब्लंडेल 16 धावांवर आणि रॉस टेलर 12 धावांवर बाद झाला.
215 धावांची अभेद्य भागीदारी
केन विल्यमसन व हेन्री निकोल्स या जोडीने 3 बाद 71 या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली. दोघांनी 215 धावांची अभेद्य भागीदारी रचत न्यूझीलंडचा डाव सावरला. केन विल्यमसनने 175 चेंडूंत 16 चौकारांसह नाबाद 112 धावांची दमदार खेळी साकारली. सलग तिसऱ्या कसोटीत त्याने शतक साकारले.
हेन्री निकोल्सनेही आठ चौकारांसह नाबाद 89 धावा फटकावल्या. दोघांनी 2018 सालापासून चार वेळा शतकी भागीदारी रचलीय हे विशेष! विराट कोहली व अजिंक्य रहाणे या जोडीने 2018 सालापासून सर्वाधिक पाच वेळा शतकी भागीदारी रचली आहे. तसेच केन विल्यमसनचे हे मागील चार डावांतील तिसरे शतक ठरले.


























































