
चालू वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्यांनी उशिराचा उन्हाळी हंगामासाठी कांदा पिकाची निवड केली. मध्यंतरी कांद्याला चांगला बाजारभाव मिळाल्याने मागील हंगामात झालेले नुकसान भरून निघेल, या आशेवर कांदा पिकाचे बियाणे घेतले. मात्र, बोगस बियाणे बाजारात आल्याने त्याचा फटका शेतकऱयांना बसला आहे.
बँक, पतसंस्था, नातेवाईक आदींकडून भांडवल उभे करून शेतकऱ्यांनी महागडे कांदा बियाणे खरेदी केले. चालू वर्षी कांद्याच्या बियाण्याने दहा हजारांचा टप्पा पार केल्याने शेतकऱ्यांना वाढत्या दराचा भार सहन करावा लागला. मात्र, बोगस बियाणे बाजारात आल्याने त्याचा फटका शेतकऱयांना बसत आहे. या बियाणांमुळे उत्पादन खर्चदेखील निघतो की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना आहे. याबाबत शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली आहे.
शेवगावच्या पूर्वभागातील शेकटे खुर्द येथील शेतकरी भागवत मारकंडे यांनी कांदा बियाण्याची रोपवाटिका तयार करून शेतामध्ये कांदा लागवड केली. यासाठी लागणारे कांदा बियाणे त्यांनी बियाणे उत्पादक कंपनीकडून खरेदी केले. मशागत, बियाणे खरेदी, खते व कीटकनाशक, कांदालागवड असा मोठा खर्च झाला असून, ऐन पीकवाढीच्या अवस्थेत असताना कांद्याला डेंगळे आल्याने कांद्याच्या उत्पादनात मोठी घट येणार आहे.
याबाबतीत संबंधित कांदा उत्पादक कंपनी व बियाणे विक्रेते यांच्याकडे तक्रार केली असून, त्यांच्याकडून पिकाची पाहणी करण्यात आली. परंतु मदतीच्या बाबतीत उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने संबंधित शेतकऱ्याने जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. नुकसानभरपाई मिळावी व संबंधित बियाणे उत्पादक कंपनीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


























































