नगर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार, महावितरणकडून दुरुस्तीसाठी शटडाऊन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

महावितरण कंपनीकडून शनिवारी (दि. 7) दुरुस्तीच्या कामासाठी पाणी योजनेवर भारनियमन घेण्यात येणार असल्याने शहराचा पाणीपुरवठा पुढील काही दिवस विस्कळीत होणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

महावितरण आणि पारेषण कंपनीकडून 33 केव्हीच्या मुळा डॅम वाहिनीचे फिडर शिफ्टिंग आणि दुरुस्ती कामासाठी सकाळी 10.30 ते 5.00 वाजेपर्यंत भारनियमन घेण्यात येणार आहे. या वेळेत महापालिकेमार्फत शहर पाणीपुरवठा योजनेवरील महत्त्वाची दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. ही कामेदेखील 10.30 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत होणार आहेत. या काळात मुळानगर, विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाही. त्यामुळे शनिवारी (दि. 7) बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, पाइपलाइन रोड, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर, सारसनगर, बुरुडगावरोड, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर आदी परिसरास पाणीपुरवठा होणार नाही. या भागाला रविवारी (दि. 8) पाणी देण्यात येईल.

मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागासह गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, म्युनिसिपल हाडको, स्टेशन रोड, विनायकनगर आदी भागाला रविवारऐवजी सोमवारी (दि. 9) पाणी मिळेल. तसेच, शहराच्या मध्यवर्ती भागातील सिद्धार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, आनंदी बाजार, कापड बाजार, ख्रिस्तगल्ली आदी भागांस मंगळवारी (दि. 10) पाणीपुरवठा होणार आहे. शहरातील पाणीपुरवठा एक दिवस बंद करून उपनगरात ज्या भागात जास्त दिवसाचे रोटेशन आले आहे, अशा भागात पाणीपुरवठा करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.