
सामना प्रतिनिधी । नगर
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रशासनाची दंडेलशाही सुरू आहे. हिंदू समाज बांधवांच्या भावना चिरडून टाकण्यासाठीच अधिकारी काम करत आहेत का? स्थानिक परिस्थितीचा विचार अधिकारी करत नाहीत, असा आरोप शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी नगर येथे प्रत्रकार परिषदेवेळी केला आहे. हिंदूंच्या भावनांचा विचार होणार नसेल तर त्याविरोधात आता रस्त्यावरच गणपती बसवणार, असा पवित्रा येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
उत्सव शांततेत साजरे व्हावेत ही प्रशासनाचीच इच्छा नाही. मंडपाची तोडफोड करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले कुणी? चुकीच्या कारवाईच्या निषेधार्थ आम्ही उपोषण सुरू करत आहोत. इथे परिस्थिती बिघडली तर त्याला प्रशासन जबाबदार असेल, असा इशाराही राठोड यांनी यावेळी दिला.
दरम्यान, नगर शहरातील नेताजी सुभाष चौकामध्ये गणपतीच्या मंडप उभारणीचे काम सुरू असतानाच आज सकाळी महानगरपालिकेच्या प्रशासनाने मंडप जेसीबीच्या साह्याने तोडल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासह मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.





























































