
सामना प्रतिनिधी । जामखेड
जामखेड येथे बीड वरून काही महिन्यांपूर्वी बाळंतपणासाठी आलेल्या सौ. रुचिरा प्रविण वाघमारे (वय २६ ) व दादासाहेब विश्वनाथ राळेभात (वय ५८) या दोघांचा पुणे येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना स्वाईन फ्लूची लागण झाल्याने मृत्यू झाला. या बाबतचे दोघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह असल्याची माहिती नातेवाईकांनी देण्यात आली आहे.
बीड येथे राहणाऱ्या सौ. रुचिरा वाघमारे (२९) या बाळंतपणासाठी आपल्या माहेरी जामखेडला काही दिवसांपूर्वी आली होत्या. बीडहून माहेरी जामखेडला येण्याआधी त्या आजारी होत्या. जामखेडला आल्यानंतर त्या आणखी आजारी पडल्या. त्यांच्यावर जामखेडमधील दोन वेगवेगळ्या खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. मात्र तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यानंतर तिला पुण्यातील रूबी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. साडेआठ महिन्यांची गरोदर असलेल्या रुचिराच्या बाळास सिझर करून बाळाला वाचवले. मात्र स्वाईन फ्लूच्या विळख्यात जखडलेल्या आईला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले.
तसेच जामखेडच्या मोरे वस्तीतील दादासाहेब विश्वनाथ राळेभात (५८) यांनाही स्वाईन फ्लूची लागण झाली होती, अशी माहिती समोर येत आहे. दोघांवर पुणे येथील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान दोघांचाही स्वाईन फ्लू ने बळी घेतला. दोघांचा मृत्यू स्वाईन फ्लूने झाला असल्याची बाब उघडकीस येताच तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मृत्यू झालेल्या दोघांचे वैद्यकीय तपासणी रिपोर्टमध्ये स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आले होते, अशी माहिती नातेवाईकांकडून मिळत आहे. मात्र याबाबत आरोग्य विभागाकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
दरम्यान, या घटनेसंदर्भात वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रुचिराचा मृत्यू स्वाईन फ्लूनेच झाला असल्याचा दुजोरा दिला. राळेभात यांच्या मृत्यू संदर्भात अधिक माहिती घेऊनच सांगता येऊ शकेल, असे डॉक्टर खराडे म्हणाले.
























































