
नगर-मनमाड महामार्ग दुरुस्तीकामी पुणतांबा फाटा ते विळद घाट या महामार्गावरील अवजड वाहतूक मनमाडहून नगर-पुण्याकडे जाण्यासाठी पुणतांबा फाटा पोहेगाव-तळेगाव- वडगावपान या मार्गावरून वळविण्यास शिवसेनेचे नितीन औताडे यांनी हरकत घेतली आहे. याबाबतचा अर्ज जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे त्यांनी केला आहे.
नगर-मनमाड दुरुस्तीकामी या महामार्गावरील अवजड वाहतूक 15 ते 30 ऑक्टोबर या 15 दिवसांकरिता पर्यायी मार्गावरून वळवण्याबाबत पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी जाहीर निवेदन दिले आहे. यामध्ये मनमाड ते पुणेदरम्यान होणारी वाहतूक पुणतांबा फाटा पोहेगाव-तळेगाव-वडगावपान या मार्गावरून वळविण्याबाबत प्रयोजन असल्याचे नितीन औताडे यांनी हरकत अर्जात नमूद केले आहे.
या हरकत अर्जात नितीन औताडे यांनी म्हटले आहे की, कोपरगाव-तळेगाव-वडगावपान या मार्गावरील तळेगाव ते झगडेफाटा रस्ता अत्यंत खराब झालेला असून सद्यस्थितीत या रस्त्यावरून सुरू असलेल्या वाहतुकीसदेखील मोठी अडचण निर्माण झालेली आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडलेले आहेत. हा रस्ता राज्यमार्ग असून या रस्त्याची वाहतूक क्षमता 13240 मे.टन / प्रतिदिन आहे. अहमदनगर-मनमाड हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग असून या रस्त्याची अवजड वाहतूक क्षमता 125000 मे.टन / प्रतिदिन पेक्षा जास्त आहे.
सदरची वाहतूक कोपरगाव, तळेगाव, वडगावपान या रस्त्यावरून वळवल्यास सदर रस्त्याचे मोठे नुकसान होईल. सद्यस्थितीत या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत असतानादेखील रस्ता दुरुस्तीच्या कामाकरिता निधी मिळू शकलेला नाही. रस्त्यावरून वाहतूक वळविल्यास 35 कि.मी. अंतर वाढणार असून या रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनांकरिता लागणारा इंधन खर्च मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, हे राष्ट्रीय संपत्तीचे मोठे नुकसान आहे.
सद्यस्थितीत पुणतांबा फाटा ते तळेगाव या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली असून वरील सर्व बाबींचा विचार करता नगर-मनमाड महामार्गावरील वाहतुकीस कोपरगाव, तळेगाव, वडगावपान, या मार्गावरून वळविण्यात येऊ नये, अशी विनंती औताडे यांनी आपल्या हरकत अर्जात म्हटले आहे.



























































