
तालुक्यातील जवळे येथील बरशिले वस्तीवरील 16 वर्षीय शाळकरी मुलीचा संशयास्पद मृतदेह तिच्या घरी आढळून आला आहे. आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याचा संशय व्यक्त होत असल्याने न्यायवैद्यक तपासणीसाठी मृतदेह नगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी जवळे येथील चार तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आणखी एका संशयित तरुणाचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. यासंदर्भात पारनेर पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.
पारनेर तालुक्यातील अस्तगाव येथील रहिवासी असलेले मुलीचे आईवडील गेल्या 22 वर्षांपासून जवळे येथे वास्तव्यास आहेत. मोलमजुरी करून ते आपला चरितार्थ चालवतात. आज सकाळी 11 वाजता नेहमीप्रमाणे मुलीचे आईवडील मोलमजुरीसाठी गेले. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मुलीचा 10 वर्षे वयाचा भाऊ शिकवणीला गेला. दुपारी मुलीचा भाऊ घरी आल्यानंतर त्याच्या हा प्रकार लक्षात आला. त्याने बहिणीला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्याने आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे लोक धावून आले. मुलीस खासगी रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास या मुलीचा घातपात झाला असावा, अशी शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुलीच्या मृतदेहाजवळ एक कापडी बोळा व घरगुती वापरातील चाकू आढळून आल्याचे सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक घनश्याम बळप जवळे येथे दाखल झाले. तोपर्यंत मुलीच्या नातेवाईकांनी मृतदेह पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवला होता. पोलीस निरीक्षक बळप यांनी मुलीच्या घराजवळील परिसरात चौकशी केली असता, दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मुलीचे आणि तिच्या मैत्रिणीचे मोबाईलवर बोलणे झाले असल्याचे पुढे आले.
दरम्यान, मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली असल्याचा संशय व्यक्त करीत आरोपीला अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही व अंत्यसंस्कार करण्यात येणार नसल्याचा इशारा संतप्त जवळे ग्रामस्थांनी व मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांना दिला. येत्या 24 तासांत प्रकरणाचा छडा लावण्यात येईल. ग्रामस्थांनी सहकार्य करावे. कोणाला माहिती असल्यास पोलिसांना कळवावी, असे आवाहन बळप यांनी यावेळी केले.

























































