नगर महापालिका निवडणूक: शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रभाग क्र.14 विनायकनगर, गणपती मंदिर येथे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार भगवान फुलसौंदर, सौ.सुरेखाताई भोसले, सौ.रेखाताई भंडारी, शैलेशकुमार गांधी यांच्या प्रचार पत्रकाचे प्रकाशन करतांना शिवसेना उपनेते अनिल राठोड. याप्रसंगी ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार, सुरेश आंबेकर, सुनिल त्रिपाठी, सुनिता फुलसौंदर, मेहुल भंडारी आदी उपस्थित होते.

सामना प्रतिनिधी । नगर

गेल्या अडीच वर्षात मनपात शिवसेनेची सत्ता होती, या अडीच वर्षांच्या काळात नगर शहरातील विविध महत्वाच्या मोठमोठ्या योजना मार्गी लागल्या तर काहींना मंजुरी मिळाली आहे, त्यामुळे येत्या काळात नगरचा विकासात मोठी भर पडणार आहेत. हे काम शिवसेनेच्या कार्यकाळातच झाले आहे. त्यामुळे यापुढील काळातही नगरचा विकास शिवसेनाच करणार आहे. त्यामुळे नागरिकांनी शिवसेनेच्या मागे उभे राहून जास्तीत जास्त उमेदवार निवडून द्यावेत. विकास कामांच्या जोरावरच आम्ही मतदारांसमोर जात आहोत. त्यामुळे मतदारही आम्हाला मनपात एकहाती सत्ता देईल यात शंका नाही. प्रभाग 14 मधील नागरिक नेहमीच शिवसेनेच्या पाठिशी उभे राहिले आहेत. त्यामुळे येत्या निवडणूकीत या भागातातील सर्वच उमेदवार विजयी होतील, असा विश्वास शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी व्यक्त केला.

प्रभाग क्र.14 विनायकनगर, गणपती मंदिर येथे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार भगवान फुलसौंदर, सौ. सुरेखाताई भोसले, सौ. रेखाताई भंडारी, शैलेशकुमार गांधी यांच्या प्रचार पत्रकाचे प्रकाशन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार, सुरेश आंबेकर, सुनिल त्रिपाठी, सुनिता फुलसौंदर, मेहुल भंडारी आदि उपस्थित होते.

पुढे बोलतांना उपनेते अनिल राठोड म्हणाले, शिवसेनेने नेहमीच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम केले आहे. त्यामुळे जनताही पूर्णपणे शिवसेनेच्या मागे आहे. या निवडणुकीत विरोधकांनी कितीही अपप्रचार केलातरी लोक त्यांच्या भुलथापांना बळी पडणार नाहीत. या भागात भगवान फुलसौंदर यांनी गेल्या 15 वर्षांपासून चांगली कामे केली आहे, त्यामुळेच ते सातत्याने या भागाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यांच्या विकासात्मकदृष्टीमुळेच हा भाग आदर्श प्रभाग म्हणून ओळखला जात आहे. त्यामुळे येथील जनता शिवसेनेचे चारही उमेदवारांना भरभरुन मतदान करतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

nagar-election-ganesh

याप्रसंगी घनश्याम शेलार म्हणाले, शिवसेनेच्या माध्यमातून शहरात विविध विकासाच्या योजना राबविण्यात आल्या आहेत. राज्यात व केंद्रात शिवसेना सत्तेत सहभागी असल्याने विविध प्रश्न मार्गी लागल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळातही मनपावर शिवसेनेचा भगवा फडकणार आहे, यात शंका नाही.

याप्रसंगी सुरेश आंबेकर, सुनिल त्रिपाठी आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. उमेदवार सुरेखा भोसले, रेखाताई भंडारी, शैलेशकुमार गांधी आदिंनी प्रभागांच्या सर्वांगिण विकासासाठी शिवसेनेला मतदान करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी परिसरातून प्रचार फेरी काढण्यात आली व मतदारांच्या गाठी-भेटी घेण्यात आल्या.

प्रभाग क्र.12 मध्येही शुभारंभ

nagar-election-ward-12माळीवाडा हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी सातत्याने शिवसेनेचे उमेदवार निवडून दिले आहेत. त्यामुळेच महापौरपदी सुरेखा कदम यांची निवड करुन या भागाला शिवसेनेने न्याय दिला आहे. तसेच यावेळी विरोधीपक्ष नेते असलेले बाळासाहेब बोराटे हेही शिवसेनेचे उमेदवार असल्याने आता संपूर्ण भाग आता शिवसेनामय झाला आहे. त्यामुळे या भागातून आता शिवसेनेचेच सर्व उमेदवार विजयी होणार आहेत. विरोधकांकडे सक्षम उमेदवार नसल्याने आता या भागातील ही निवडणुक एकतर्फीच झालेली आहे. सेनेच्या सर्व उमेदवारांनी मनपातील अनुभवी नगरसेवक म्हणून काम केलेले आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात प्रभागाचा विकास तर केलाच परंतु त्याचबरोबर प्रभागाबाहेरील नागरिकांच्या अडचणी सोडविल्या आहेत. त्यामुळे या उमेदवारांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. हे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले.

प्रभाग क्र.12 मधील शिवसेनेचे उमेदवार महापौर सुरेखा कदम, बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे, मंगल लोखंडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या हस्ते आरती करुन करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार, संभाजी कदम, अनिल लोखंडे, चैताली बोराटे, ऋषीकेश कावरे, परेश लोखंडे आदिंसह असंख्य नागरिक उपस्थित होते.

याप्रसंगी महापौर सुरेखा कदम म्हणाल्या, शिवसेनेने नेहमीच सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले आहे, त्यामुळेच माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटूंबातील एका स्त्रीला महापौर केले. महापौरपद व नगरसेवकपदाच्या काळात प्रभागातील सर्वच मुलभूत सुविधांना प्राधान्य देऊन प्रभागाचा विकास केला आहे. त्यामुळे पुढील काळातही प्रभागातील जनता आमच्यामागे उभी राहिल, यात शंका नाही.

याप्रसंगी बाळासाहेब बोराटे यांनी सांगितले की, आपण शहर व प्रभागाच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. विरोधीपक्ष नेता असलो तरी चांगल्या कामांना आपण कधीही विरोध केला नाही. प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिले आहे. त्यामुळे नागरिक आपल्या गेल्या 25 वर्षांपासून मागे आहे आणि यापुढेही मागे राहील. हा विश्वास आहे.