
सावेडीसाठी स्वतंत्र स्मशानभूमीच्या जागेच्या वादावरून आजची महासभा गाजली. स्मशानभूमीसाठी पूर्वी आरक्षित केलेली जागा संपादित न करता नवीन जागेवर स्मशानभूमी करण्याचा प्रस्ताव सभेसमोर ठेवण्यात आला होता. महासभेचा विरोध असतानाही महापौर रोहिणी शेंडगे यांनी स्मशानभूमीची नवीन जागा संपादित करण्यास मंजुरी दिली.
महापौर शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली महासभा घेण्यात आली. यावेळी उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त डॉ. पंकज जावळे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, नगर सचिव एस. बी. तडवी आदी उपस्थित होते.
नगररचनाकार राम चारठाणकर यांनी सावेडी स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून भूसंपादन करण्याचा विषय मांडला. सावेडी भागात दोन हेक्टर जागा असून, जागामालक जागा देण्यास तयार आहे. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे त्या जागेला 32 कोटी मूल्य असून, महापालिका विकासभार निधीतून ती रक्कम देणार आहे. तत्त्वतः मान्यतेसाठी हा प्रस्ताव मांडण्यात आला. याला नगरसेवक अनिल शिंदे यांनी विरोध केला. नगर शहरासाठी अमरधाम येथील एकमेव स्मशानभूमी आहे. नागापूर, बोल्हेगावसह सावेडीच्या नागरिकांना अंत्यविधी करण्यासाठी थेट अमरधाममध्ये यावे लागते. सावेडीसाठी स्वतंत्र स्मशानभूमी हवी ही अनेक वर्षांची मागणी आहे. त्यानुसार जागाही आरक्षित करण्यात आली. मात्र, प्रशासनाला ती आजवर संपादित करता आली नाही. जागामालकाने जागा देण्यास विरोध केल्याने नगररचना विभागाने स्मशानभूमीसाठी अन्य जागेचा शोध घेतला. बाजारभावाप्रमाणे 32 कोटी रुपयांची अडीच हेक्टर जागा खरेदी करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, अनिल शिंदे, मदन आढाव यांनी विरोध करूनही महापौर शेंडगे यांनी याला मंजुरी दिली.
गरज नसताना आरक्षण
– स्मशानभूमीसाठी पूर्वीची जागा आरक्षित असतानाही कोटय़वधी रुपयांची नवीन जागा विकत घेणे कितपत योग्य आहे, असा सवाल नगरसेवकांनी महासभेत उपस्थित केला. याप्रकरणी गृह विभागाकडून चौकशी करावी लागणार असल्याचे ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे यांनी सभागृहात स्पष्ट केले.
कचरा डेपोच्या जागेवर अडचणी
– सावेडी कचरा डेपोच्या जागेवर स्मशानभूमी करणे शक्य आहे. नवीन जागेवर आरक्षण टाकून ती जागा भूसंपादित करणे सोईस्कर वाटत नाही. त्यामुळे कचरा डेपोच्या जागेवरच स्मशानभूमी केल्यास मनपाचा खर्चही वाचेल, अशी सूचना नगरसेवक मदन आढाव यांनी सभागृहात मांडली. मात्र, कचराडेपोच्या जागेवर स्मशानभूमी करण्यास कायदेशीर अडचणी आहेत. त्यामुळे ते बदलू शकत नाही, असे उपमहापौर गणेश भोसले यांनी स्पष्ट केले.


























































