नगर- पुणे महामार्गावरील रेल्वे पुलाला तडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर-पुणे महामार्गावर असलेल्या रेल्वे स्थानकालगतच्या पुलाला तडे गेल्याने येथील पुलाची अवस्था धोकादायक झाली आहे. त्यामुळे दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे. वारंवार पुलांचे स्टक्चरल ऑडीटचा मुद्दा उपस्थित करण्यात येतो. स्ट्रक्चरल ऑडिट झाले असते तर या पुलाची स्थिती उघड झाली असती. मात्र, अद्यापही स्ट्रक्चरल ऑडीट झाले नसल्याने धोकायदाक असलेल्या या पूलाकडे प्रशासन लक्ष देणार का, असा सवाल नागरिक करत आहेत.

शहरात अनेक छोटे मोठे अपघात होत असतात. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. रेल्वे स्थानकाच्या जवळच असलेल्या पुलाची अवस्था पाहिली तर दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मात्र, याकडे बांधकाम विभाग आणि इतर विभाग दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. राज्य सरकारने सर्व पुलांचे ऑडिट करावे असे आदेश दिले होते. त्यानुसार या पुलाचासुद्धा त्यात समावेश होता. नगर शहरामध्ये स्टेशन रोडकडे जाणार्‍या लोखंडी पूल दोन वर्षांपूर्वी कोसळल्यामुळे तो दुरुस्त करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला होता. महानगरपालिकेने हा पुल नव्याने बांधला असून त्याचे उद्घाटन झालेले नाही. नगर शहराच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला नगर-पुणे महामार्गावरील रेल्वे पूल गेल्या अनेक वर्षांपासून दूरवस्थेत आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये तात्पुरत्या स्वरूपाची डागडुजी करण्यात आली होती. मात्र त्यातुन हा प्रश्‍न अद्यापही सुटलेला नाही. मात्र, आता त्या पुलाला तडे पडल्याने पुन्हा एकदा हा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. तसेच पूलाची अनेक ठिकाणी पडझड झाल्याचेही दिसत आहे. लवकरात लवकर हा पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.