
शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या स्वच्छतागृहामध्ये एका इसमाचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वर तुकाराम मराठे (वय 62, मूळ रा. फलटण, जि. सातारा) असे मृताचे नाव आहे. कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे.
कोतवाली पोलीस ठाण्याच्या आवारातील स्वच्छतागृहातून दुर्गंधी येत असल्याने माहिती घेण्यासाठी पोलिसांनी पाहणी केली असता, स्वच्छतागृहात आतील बाजूला कडी लावल्याचे दिसून आले. खिडकीतून आत डोकावले असता, आतमध्ये एकजण असल्याचे दिसून आले. पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी तत्काळ याची माहिती वरिष्ठांना दिली. पोलीस उपअधीक्षक अजित पाटील हे घटनास्थळी दुपारी दाखल झाले. आज दुपारी दीडच्या दरम्यान स्वच्छतागृहाचा दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
पोलीस उपअधीक्षक अजित पाटील म्हणाले, हा मृतदेह फलटण येथील निवृत्त एसटी कर्मचाऱयाचा असून, त्यांनी स्वच्छतागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या संदर्भात ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद केली असून, नेमकी ती व्यक्ती नगरमध्ये कशासाठी आली होती, कोणाकडे आली होती, याचीसुद्धा माहिती घेत आहोत. त्याच्याकडे एक बॅग सापडली असून, त्यामध्ये कपडे व इतर वस्तू आहेत. त्यांनी आत्महत्या का केली, याचे कारण समजले नसल्याचे त्यांनी सांगितले.

























































