
कपडय़ांवर विणकाम करताना आपण अनेकांना बघितलंय, पण पानांवर कशिदा किंवा विणकाम बघितलंय का? नगर जिल्ह्यातील सौरभ देवढे या 21 वर्षांच्या युवकाने ही भन्नाट संकल्पना प्रत्यक्षात साकार केलीय. क्वारंटाईन असताना त्याने पहिल्यांदा वडाच्या सुकलेल्या पानांवर सुई-धाग्यांनी नक्षी विणली. मग काय, त्याची क्रिएटिव्हिटी सुसाट धावू लागली. त्याच्या पानांवरील नक्षीकामाला जबरदस्त प्रतिसाद मिळू लागला. आज सुकलेल्या पानांच्या आर्टमधून तो चांगली कमाई करत आहे.
पाथर्डीतील मोहोज देवढे गावचा सौरभ देवढे याने टेक्सटाईल आणि डिझाईनमध्ये डिप्लोमा केला आहे. जेव्हा पहिला लॉकडाऊन लागला तेव्हा सौरभ अहमदाबादला शिकायला होता. जेव्हा वाहतूक सुरू झाली तेव्हा तो गावाला आला. नगरमध्ये त्याची आरोग्य तपासणी झाल्यानंतर पाथर्डीत त्याला क्वारंटाईन करण्यात आले. तिथे वडाचे झाड होते. त्याची पिवळी पानं खाली पडली होती. सौरभकडे सुई आणि धागा होता. सौरभच्या डोक्यात वेगळीच कल्पना आली. जसं कपडय़ांवर विणकाम करतो, तसं पानांवर केलं तर… सौरभने सुई-धाग्याच्या मदतीने एक साधी डिझाईन पिवळ्या पानावर साकारली. ओली पानं तसंच खाली पडलेली पानं नीट सुकवून त्यावर त्याने आपली कारागिरी सुरू ठेवली. अशा तऱहेने कलेचं वेगळं दालन सौरभसाठी खुलं झालं. कलाकृतींचे फोटो त्याने इन्स्टाग्रामवर अपलोड करायला सुरुवात केली. त्यातूनच त्याला पहिली ऑर्डर मिळाली. हळूहळू त्याचा जम बसू लागला. आज महाराष्ट्रभरात तसेच दिल्ली, पंजाब, हरयाणा, आसामसह देशभरात त्याच्या कलाकृती पोचल्या आहेत.
सौरभ वडाची पाने तसंच जांभूळ आणि चिकूच्या पानावरही विणकाम करतो. फुले, पक्षी, इंद्रधनुष्य, सुविचार यांची नक्षी साकारतो. फक्त कॉटनचा धागा आणि बारीक सुई याव्यतिरिक्त तो काही वापरत नाही. ग्राहकांची जशी मागणी असेल त्यानुसार कलाकृती तयार करतो. सुकलेल्या पानांवरील या कलाकृतींना फ्रेम केल्यामुळे त्या वर्षानुवर्षे टिकतात, असे सौरभने दैनिक ‘सामना’शी बोलताना सांगितले.





























































