नगर अर्बनच्या 22 कोटींच्या कर्जप्रकरणात अखेर गुन्हा दाखल, भाजपच्या दिलीप गांधींसह संचालक मंडळ आरोपी

नगरमधील शतक महोत्सवी परंपरा असलेल्या प्रसिद्ध नगर अर्बन मल्टिस्टेट शेडय़ुल्ड बँकेतील दुसरा गैरप्रकार अखेर उघड झाला आहे. 22 कोटींच्या या कर्जवाटपाबाबतचा बहुप्रतीक्षेत असलेला गुन्हा अखेर पिंपरी-चिंचवड येथे दाखल झाला आहे. यात संबंधित कर्जदारांसह बँकेची कर्ज उपसमिती तसेच बँकेचे माजी अध्यक्ष व भाजपचे नगरचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखालील कर्जमंजुरी देणाऱ्या संचालक मंडळाला आरोपी करण्यात आले आहे.

महिनाभरापूर्वीच बँकेच्या 3 कोटींच्या बोगस कर्जप्रकरणी कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर चिंचवड शाखेतील गैरप्रकाराबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. नगर अर्बन बँकेच्या चिंचवड शाखेत 22 कोटींच्या कर्ज प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी नगर अर्बन बँक बचाव कृती समितीने करून मागच्या आठवडय़ात प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले होते. त्याचवेळी प्रशासक मिश्रा यांनी बँकेचे प्रमुख व्यवस्थापक (वसुली) महादेव साळवे यांना संबंधित गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी 21 जानेवारीला पिंपरी-चिंचवडला जाऊन सविस्तर तक्रार अर्ज दिला होता. त्याचा अभ्यास केल्यानंतर चिंचवड पोलिसांनी 25 जानेवारी रोजी कर्जदार बबन चव्हाण, वंदना चव्हाण, यज्ञेश चव्हाण, मंजूदेवी हरिमोहन प्रसाद, रामचंद्र तांबिले (सर्व रा. चिंचवड), अभिजित नाथा घुले (रा. बुरुडगाव रोड, नगर) यांच्यासह बँकेच्या कर्ज उपसमितीमधील सदस्य व दिलीप गांधी यांच्यासह संचालक मंडळाच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या