नगर जिल्हा परिषदेच्या निधीवाटपात दुजाभाव; विकासनिधीवरून महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्हा परिषदेने तयार केलेला विकासकामांचा आराखडा परस्पररीत्या बदलला जातो. कामवाटपाच्या संदर्भामध्ये जो निधी द्यायचा असतो, त्यामध्ये दुजाभाव केला जातो, ही बाब योग्य नाही. कोणाच्या तरी सांगण्यावरून प्रशासन अशा पद्धतीने वागणार असेल तर आम्हीसुद्धा आता यापुढील काळामध्ये सर्व बाबींचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिला.

जिल्हा परिषदेच्या सदस्यांना आपापल्या गटामध्ये निधी मिळत नाही तसेच निधीचे योग्य पद्धतीने वाटप केले जात नाही, ही बाब निदर्शनास आल्यानंतर आज आमदार थोरात यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे, लहू कानडे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराल, सुनील गडाख, अजय फटांगरे, बाबासाहेब भिटे, प्रताप शेळके आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले, आपण जो काही निधी वितरित करतो, तो जिल्हा नियोजनात असो अथवा राज्य शासनाकडून आलेला असो, त्यामध्ये भेदभाव केला जात आहे, ही बाब निदर्शनास आली आहे. वास्तविक पाहाता जिल्हा परिषदेने जो आराखडा तयार केलेला होता, तो आराखडा थेट बदलून टाकलेला आहे. तो कोणाच्या सांगण्यावरून बदलून टाकला, त्याचा अधिकार प्रशासनाला आहे का, असा जाबही त्यांनी यावेळी विचारला.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी आम्ही विभागीय आयुक्त यांच्याकडे हा आराखडा पाठवलेला होता. त्यांनी काही कामांमध्ये दुरुस्ती सुचवली होती. असे म्हटल्यानंतर बाळासाहेब हराळ यांनी तुम्हाला सर्वच आराखडा बदलता येत नाही व तुम्ही हा आराखडा कोणाच्या सांगण्यावरून बदलला, असा जाब त्यांनी विचारला, त्यावेळी जिल्हाधिकारी सालीमठ यांनी या सर्व संदर्भामध्ये आपण निश्चितपणे चौकशी करू, असे त्यांनी सांगितले.

श्रीरामपूरचे आमदार कानडे यांनी श्रीरामपूर तालुक्यामध्ये सर्रासपणे रात्रीतून वाळूउपसा केला जातो, ही बाब अतिशय गंभीर आहे. तिथे मात्र प्रशासनाला काही दिसत नाही का? असा सवाल उपस्थित केला.

आज दाखले मिळत नाहीत, नवीन रेशन कार्ड मिळत नाही, नवीन रेशन कार्ड्स अपलोड होत नाही. सेतू कार्यालय चालू आहे का बंद आहे, अशी अवस्था निर्माण झालेली आहेत. शाळेमध्ये प्रवेश घेताना मोठी कसरत करावी लागत आहे, याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे आमदार थोरात म्हणाले. ते पुढे म्हणाले, नगर जिह्यामध्ये गुन्हेगारीही वाढत चाललेली आहे. चोऱया वाढत चाललेल्या या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस विभागाला केलेल्या सर्व सूचना व उपाययोजनांची यावेळी माहिती दिली.

ड्रायव्हरच आहे कोतवाल!

राहुरीचे तहसीलदार यांच्या गाडीवरचा जो ड्रायव्हर आहे, तो कोतवाल आहे. तोच आता दाखले देण्याचे काम करतो. त्याच्याकडेच सर्व पासवर्ड वगैरे देण्यात आलेला आहे, असे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी जिल्हा प्रशासनाच्या समोर मांडली. त्यावेळी जिल्हाधिकारी सालीमठ यांनी याची निश्चितपणे दखल घेतली जाईल, असे सांगितले.