नगर झेडपी सीईओ करणार ‘जलजीवन’ची पाहणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘जलजीवन मिशन योजने’च्या कामाबाबत अनेक तक्रारी आहेत. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार), उद्या (रविवारी) ‘जलजीवन मिशन योजने’च्या कामाची पाहणी करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष येरेकर यांनी घेतला आहे. यावेळी झेडपीचे सर्व विभागप्रमुख जिल्हाभर फिरून ‘जलजीवन योजने’च्या कामांची पाहणी करून आशीष येरेकर यांच्याकडे अहवाल सादर करणार आहेत.

शनिवारी व रविवारी जिल्हा परिषदेतील सर्व विभागांचे प्रमुख पाणी योजनांच्या कामांची पाहणी करणार आहेत. त्यांना ठरावीक मुद्दे देऊन त्यांची पाहणी करण्याचे सांगण्यात येणार आहे. पाहणीनंतर विभागप्रमुख आपला अहवाल सादर करणार आहेत. पाहणीचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापुरताच मर्यादीत राहणार आहे. दरम्यान, यापूर्वी ‘जलजीवन योजने’च्या कामांच्या निविदा प्रक्रियेत 850 कोटींचा घोटाळा झाला. त्यात एक आमदार व त्यांच्या स्वीय सहायकाचा समावेश असल्याचा आरोप झालेला आहे.

सीईओ येरेकर यांनी 15 ते 20 दिवसांपूर्वी आजवर झालेल्या पाणी योजनांची बिले थांबविली होती. तसेच सात ते आठ दिवसांत झालेल्या कामांची समक्ष तपासणी करून त्याचा अहवाल आल्यानंतर ही बिले अदा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यानंतर कामांची संबंधित अभियंत्यांनी तपासणी करून तो अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱयांना दिलेला आहे. त्यात त्या अहवालात किरकोळ त्रुटी आढळून आल्या असून, त्या दुरुस्ती केल्या आहेत.

जिह्यात ‘जलजीवन मिशन’ योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून सुमारे 850 कोटींची पाणी योजनांची कामे 900 गावांमध्ये करण्यात येत आहेत. त्यात सुमारे 15 पाणी योजनांची कामे पूर्णदेखील झाली आहेत. मात्र, या पाणीयोजनांच्या कामांबाबत अनेकांनी शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी या पाणीयोजनांच्या कामांची एकाचवेळी पाहणी करून कामात त्रुटी राहणार नाहीत, या दृष्टीने काळजी घेत आहेत.

‘जलजीवन’ची सर्व कामे उत्कृष्ट
आतापर्यंत झालेली सर्व कामे उत्कृष्ट झाली असून, त्यात कोठेही चुकीच्या गोष्टी झालेल्या नसल्याचा दावा येरेकर यांनी केला आहे. परंतु चुकून काही त्रुटी राहिल्या, तर त्याही या तपासणीमध्ये दुरुस्त होती म्हणून ही पाहणी मोहीम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.