नगर जिप अध्यक्षपदासाठी विखे गटामध्ये संभ्रम, निवडणुकीपासून दूर राहण्याची शक्यता

1240

नगर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसकडून शालिनीताई विखे यांचे नाव आघाडीवर आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडी होण्याचे घाटत आहे. महाविकास आघाडी झाली तर राजकीय अडचण होईल, त्यातच दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार असे सूतोवाच केल्याने शालिनीताई विखे यांना उमेदवारी द्यायची की नाही ,याबाबत विखे गटाकडून चाचपणी करण्यात येत आहे. एकंदरीत विखे यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण झाला असून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी होत आहे.

जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस 23, राष्ट्रवादी काँग्रेस 19 ,भाजप 14, शिवसेना 7, क्रांतिकारी शेतकरी दल 5, महाविकास आघाडी 2, भाकप 1, जनशक्ती विकास आघाडी 1, अपक्ष 1, असे एकूण 73 संख्याबळ आहे. अकोल्याचे डॉ. किरण लहामाटे आमदार झाल्यामुळे त्यांची जागा सध्या रिक्त आहे. त्यामुळे 72 सदस्य राहिले आहेत. जिल्हा परिषदमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता असताना तत्कालीन मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पत्नी शालिनीताई विखे या अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये सुजय विखे यांनी भाजपमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी राधाकृष्ण विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, शालिनीताई विखे या काँग्रेसमध्ये असल्यामुळे पक्षपातळीवर त्यांची मोठी अडचण झाली आहे. वास्तविक, राज्यांमध्ये नव्याने महाविकास आघाडी स्थापन झाल्यामुळे आता त्यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे .जिल्हा परिषदमध्ये भाजपचे 14 सदस्य आहेत. त्यामुळे त्यांना बहुमताचा आकडा गाठायचा असेल तर इतर पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे बहुमतासाठी सहजासहजी जुळवाजुळव होणार की नाही याची चाचपणी विखे यांच्याकडून सध्या सुरू आहे .खासदार सुजय विखे यांनी जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी संपर्क केल्याचे बोलले जात आहे .

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्यामुळे या जागेवर शालिनीताई विखे यांना उमेदवारी द्यायची असेल तर संख्याबळाचे गणीत जुळवावे लागणार आहे. सहजासहजी शक्य असेल तर निवडणूक करावी अन्यथा पक्षातील अन्य उमेदवाराला संधी दिली जाईल अशी चर्चा काँग्रेस अंतर्गत सुरू झाली आहे. विखे यांना मानणारे काँग्रेसमधील बारा ते तेरा सदस्य आहे, त्यामुळे निवडणूक लढवण्याची वेळ आली तर भाजपकडून त्यांना साथ मिळेल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे सत्तेचे गणित मांडायचे कसा असा प्रश्न समोर आहे. महाविकास आघाडी करून निवडणूक लढवावी असे अनेक सदस्यांची भूमिका आहे. वरिष्ठ पातळीवर याबाबत निर्णय होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या स्थानिक पातळीवर कसे संख्याबळ आहे याची माहिती आता काँग्रेस राष्ट्रवादीसह अन्य पक्षांनी वरिष्ठ पातळीवरून घेण्यास सुरुवात केली आहे. साधारणता एक-दोन दिवसांमध्ये वरिष्ठ पातळीवर यासंदर्भात बैठक होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेमध्ये आता काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. राधाकृष्ण विखे व सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आता आघाडीमध्ये विखे गटाला किती स्थान द्यायचं याबाबत सुद्धा आता स्थानिक पातळीवर चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे मात्र विखे गटाने सत्तेचे गणित जुळते की नाही याकरता चाचपणी सुरू केलेली आहे. 31 डिसेंबरला होणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी सध्या राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या