नागपूर अमरधाममध्ये कोरोना मृतदेहाच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था, भाजीपाला व्यापारी असोसिएशनचा पुढाकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाने जिल्ह्यात कहर माजवला असताना, दररोज मोठय़ा संख्येने कोरोना रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. मृत झालेल्या कोरोना रुग्णांवर अंत्यविधीसाठी शहरातील अमरधाम अपुरे पडत आहे. मृतदेह अमरधाममध्ये आणण्यास काही रुग्णवाहिका चालक सात ते आठ हजार रुपयांची मागणी करीत आहेत. अशा परिस्थितीमध्ये सामाजिक भावनेने नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनने पुढाकार घेऊन नागापूर येथील कैलासधाम या स्मशानभूमीत कोरोना रुग्णांच्या अंत्यविधीची जबाबदारी उचलली आहे. कोरोना रुग्णाचे मृतदेह आणण्यासाठी अत्यल्पदरात शववाहिकादेखील उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अंतोन गायकवाड यांनी दिली.

कोरोनाने शहरासह जिल्ह्याची परिस्थिती गंभीर बनली असताना, दररोज कोरोना रुग्णांचे मृतदेहांचे खच पडत आहेत. याचा ताण शहरातील एकमेव अमरधामवर पडत आहे. दररोज 45 पेक्षा जास्त मृतदेह अंत्यसंस्काराला येत आहेत. विद्युतदाहिनीची क्षमता 20 मृतदेहांची असताना उर्वरित मृतदेहांची ओटय़ावर चिता रचून अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये केडगाव अमरधामच्या धर्तीवर नागापूर येथे कोरोनाने मृत पावलेल्या मृतदेहाच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यात आली आहे.

शहरातील अमरधाममध्ये दिवसातून 45पेक्षा जास्त कोरोनाने मृत पावलेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत असतानाचे विदारक व मन हेलावणारे चित्र पाहावयास मिळाले. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात अंत्यविधी करूनदेखील उर्वरित मृतदेह प्रतीक्षेत आहेत. शहरातील अमरधामचा भार हलका करण्यासाठी व मृतदेहावर वेळेत अंत्यविधी होण्यासाठी नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनने पुढाकार घेतला आहे. मृतदेह घेऊन जाण्यासाठी शववाहिकादेखील उपलब्ध करून देण्यात आली असून, कोरोनाच्या मृतदेहावर अत्यल्प एक हजार रुपयांत अंत्यविधी करण्यात येणार असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष अंतोन गायकवाड यांनी सांगितले.