लांब चोचेचे गिधाड पेंचमधून थेट नाशिकमध्ये, 17 दिवसांत 750 किलोमीटरचा प्रवास

नागपूरजवळच्या पेंच व्याघ्र प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या एक लांब चोचीच्या गिधाडाचा थक्क करणारा प्रवास उलगडला आहे. हे गिधाड 17 दिवसांमध्ये 750 किलोमीटरचा प्रवास करून नाशिकजवळच्या अंजनेरी टेकडीजवळ पोहोचले आहे. गिधाडाला जीपीएस ट्रान्समीटर लावण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या हालचाली, अधिवास आणि जगण्याचे दीर्घकालीन निरीक्षण करणे शक्य होते.

11 डिसेंबरला ‘जे-132’ नावाचे गिधाड पेंच व्याघ्र प्रकल्पातून सोडण्यात आले होते. ते आता अंजनेरीपासून 38 किलोमीटर अंतरावर दाखल झाले आहे. हनुमानाचे जन्मस्थान म्हणून ओळखला जाणारा हा परिसर गिधाडांच्या अधिवासासाठी ओळखला जातो. हे गिधाड नागपूर, यवतमाळ, हिंगोली, वाशीम, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून प्रवास करत अंजनेरीजवळ दाखल झाले. या गिधाडाने प्रवासात किमान दोन वेळा पोटभर जेवण केल्याचे वन विभागार्ते सांगण्यात आले.