नागपुरात वीज पडून मायलेकासह तिघे ठार; वडिलांनंतर आईचे छत्र हरवले, कुटुबांत सुलगी एकटी उरली

उपराजधानी नागपुरात पावसाच्या दमदार हजेरीने पाणीच पाणी झाले आहे. यादरम्यान कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा शिवारात शेतात काम करत असलेल्या तिघांवर काळाने घाला। घातला. वीज कोसळून माय-लेकासह एक महिला मजूर जागीच ठार झाल्याची घटना घडली.

आई वंदना प्रकाश पाटील (४२), मुलगा ओम प्रकाश पाटील (१८) व शेतमजूर निर्मला रामचंद्र पराते (६०) अशी मयत झालेल्यांची नावे आहेत धापेवाडा येथील शेतकरी प्रकाश पाटील यांच्या पाच एकर शेतीत कपाशीची लागवड करण्यात आली होती. यावर्षी चांगल्या पावसामुळे पीक बहरले होते. कपाशीला रासायनिक खत देण्यासाठी मृतक वंदना पाटील व त्यांचा मुलगा ओम आणि इतर पाच मजूर सकाळपासून शेतात काम करीत होते. दुपारी अचानक जोराच्या पावसाला सुरुवात झाल्यानंतर तिघांच्या अंगावर वीज कोसळली. कळमेश्वर पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.

१५ वर्षीय मुलगी झाली एकाकी

या घटनेमुळे पाटील कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. दोन वर्षांपूर्वी वंदना पाटील यांच्या पतीचे निधन झाले होते. त्यानंतर वंदना आणि मुलगा ओम शेतीत राबून घर चालवित होते. १५ वर्षांची मुलगी पिहू हिचे शिक्षण सुरू असून, दुर्देवी घटनेने आई आणि मुलगा दोघेही गेल्याने पिहू एकाकी झाल्याने अंतामुळे धापेवाडावासीयांत हळहळ व्यक्त होत आहे.