चहापेक्षा किटली गरम, ठीक आहे; पण इथे तर किटली पकडणारी फडकीही गरम झाली आहेत!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
uddhav-thackrey-interview

आमचं सरकार गरीबांचं, सर्वसामान्यांचं असून गरीबांना बुलेट ट्रेनपेक्षा तीन चाकी रिक्षाच परवडते. कमी बोलावे आणि जास्त काम करावे ही आमच्या साधुसंतांची शिकवण आहे, असे टीकेचे बाण सोडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना चांगलेच तडकावले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बुलडोझर फिरला आणि विरोधक पार भुईसपाट झाले. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, चहापेक्षा किटली गरम ठीक आहे, पण इथे तर किटली पकडणारी फडकीही गरम झाली आहेत… तेव्हा सत्ताधारी बाकांवरून प्रचंड हंशा उसळला, कौतुकाने बाके वाजली… पण विरोधकांच्या बाकांवरील चेहरे पाहण्यालायक झाले होते. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षाच्या सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्दय़ाचा आज विधानसभेत सडेतोड समाचार घेतला. राज्यात सुरू असलेल्या कोणत्याही कामांना स्थगिती दिली नसून विकासकामांच्या आदेशांमधील त्रुटी दूर करून कामे सुरू केली जातील. आम्ही दिलेला शब्द पाळतो, पुढेही पाळू. हे सरकार कुणाशी दुजाभाव करणार नाही, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

प्रदीर्घ काळाने, किंबहुना प्रथमच राज्यपालांनी मराठीत भाषण केले असावे, असे नमूद करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, सत्ताबदलाची चाहुल आणि वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत याचा अंदाज राज्यपालांच्या भाषणातून येतोय. राज्यपालांनी मराठीतून भाषण केलं त्याबद्दल मी संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो.

शांत व संयत शैलीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी उत्तराला सुरुवात केली आणि टप्प्या टप्प्याने त्यांची आक्रमणाची धार अधिकाधिक धारदार होत गेली. ‘राज्यपालांचे अभिभाषण यंदा आटोपशीर आहे. कारण कमी बोलायचे आणि जास्त काम करायचे हा आमच्या सरकारचा बाणा आहे,’ असा जोरदार टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी लगावला तेव्हा सत्ताधाऱयांनी बाके वाजवून विधानसभेचे सभागृह दणाणून सोडले. याच मुद्दय़ावर मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले, ‘कमी बोलावे आणि जास्त काम करावे ही आपल्या साधुसंतांची शिकवण आहे. अभिभाषण किंवा भाषण किती पानांचे आहे, यापेक्षा त्यात महाराष्ट्राच्या प्रगतीची किती पाने आहेत हे महत्त्वाचे. आमची स्थगितीची नाही, प्रगतीची गीता आहे.’

मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांच्या सर्व आरोपांना आणि टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं. ‘काहीजणांनी म्हटलं हे त्रिशंकू सरकार आहे. देवेंद्रजी तर म्हणाले, हे तीन चाकी रिक्षाचे सरकार आहे,’ असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार तडाखा लगावताना म्हटले, ‘होय, हे तीन पक्षांचं तुमच्या भाषेत तीन चाकांचं सरकार आहे. असेल. पण हे गोरगरीब जनतेचं सरकार आहे. महाराष्ट्रातल्या गरीबाला रिक्षाच परवडेल. तुमची बुलेट ट्रेन नाही परवडणार!’ या महाआक्रमणावर सत्ताधारी आमदारांनी बाकांचा गजर करीत मुख्यमंत्री ठाकरे यांना दाद दिली.

राज्यकर्त्याने काय करायला हवं! गाडगेबाबांची शिकवण मंत्रालयातील दालनात लावणार

आमच्या प्रगतीच्या गीतेमध्ये सर्व वर्ग आलेले आहेत. आरोग्य आलेलं आहे, शिक्षण, महिला आणि आपल्या प्रशासनाचा पाठकणा आशा आणि अंगणवाडी सेविका यांचाही यामध्ये उल्लेख आहे. हे सांगताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, काही वेळा योगायोग असतो. उद्या संत गाडगेबाबांचा स्मृतिदिन आहे. विदर्भाचे…अमरावतीचे… माझ्या आजोबांचे त्यांच्याशी ऋणानुबंध होते. माझे आजोबा त्यांच्या गोष्टी सांगायचे. तो साधासुधा माणूस. साध्या भाषेत त्यांनी जीवनाचं सार समजावून सांगितलंय. ते कीर्तन करायचे तेव्हा त्यांना विचारलं जायचं, धर्म म्हणजे काय? आम्ही अडाणी आहोत, आम्हाला धर्म नाही कळत. आम्ही जगायचे कसे? तेव्हा ते सांगायचे,

‘धर्म सांगायचा नसतो धर्म जगायचा असतो. धर्म ग्रंथात नसतो, जगायचा असतो. गाडगेबाबा धर्माचे सार सांगायचे की, धर्म म्हणजे काय, भुकेल्या जिवांना अन्न द्या, तहानलेल्यांना पाणी द्या, उघडेनागडे आहेत त्यांना वस्त्रं द्या. बेघरांना आसरा द्या, बेकारांना रोजगार द्या, अंध-अपंगांना औषधोपचार द्या, दुःखी- निराशांना जगण्याची हिंमत द्या. मुक्या प्राण्यांना अभय द्या. मुलामुलींना शिक्षण द्या, गरीब तरुण-तरुणींचे विवाह लावून द्या. कर्ज काढू नका, चैन करू नका. कष्टाशिवाय भाकर खाऊ नका. निरंतर उद्योग करा.’

सरकार म्हणून काय करायला पाहिजे, जनतेला काय अपेक्षा आणि चांगल्या राज्यकर्त्याने काय करायला हवं, हे यात लिहिलेलं आहे. हा विचार मंत्रालयात मोठा करून माझ्या दालनात मी लावणार आहे.

  • तुम्ही समजू नका की हे सरकार काही करत नाही, असे नमूद करीत मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, शेतकऱयांचा मुद्दा इथे मांडण्यात आला. ‘कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही’ हे सर्व झालं. पण कोण ओरडतंय शेतकऱयांबद्दल? कोणी असं म्हणावं…? गेल्या काही वर्षांत, माझ्या मित्रपक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष होते, त्यांनी असे उद्गार काढले होते, की ‘तुरीला एवढा भाव देऊनसुद्धा रडताहेत साले.’ आता शेतकरी संतापलेत. ते असे म्हणताहेत की, ‘आता ओरडताहेत विरोधी पक्ष.’ हा जो शेतकऱयांचा पुळका तुम्हाला अचानक आलाच आहे तो तुम्ही आम्हाला सांगण्याची गरज नाही. आम्ही दिलेला शब्द पाळतो आणि शेतकऱयांना दिलेला शब्द मी पाळणारच.

मोदीजींबरोबर तुमचं मत जुळत नाही का?

‘सामना’चा दाखला दिला गेला. ‘सामना’मध्ये शरद पवारांवर कशी टीका करण्यात आली हे दाखवलं गेलं. मला ‘सामना’चं संपादकपद इथे आल्यामुळे सोडावं लागलं. पण मी त्या ‘सामना’चा संपादक होतो. त्यामुळे त्यात लिहिलेल्या प्रत्येक शब्दाला मी बांधील आहे, असे सांगत मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले, त्या ‘सामना’मध्ये नरेंद्र मोदींचं कौतुकही केलं गेलं आहे, ते इथे दाखवलं गेलं नाही. म्हणजे सोयीचं तेवढं दाखवायचं आणि मोदीजींची जी तारीफ आहे ती गैरसोयीची म्हणून वाचायची नाही, असं जर कोणी ठरवलंय का काय हे माहीत नाही. तिथे ‘सामना’मध्ये मोदीसाहेबांनी पवारसाहेबांचा कसा उल्लेख केला ते लिहिलं होतं. अजितदादा, तुम्ही त्या कार्यक्रमाला असाल. बारामतीमध्ये पवारसाहेबांनी मोदीजींना बोलावलं होतं. तेव्हा मोदीजींचं एक वाक्य होतं की, ‘पवारसाहेबांचं बोट धरून मी राजकारणात आलो, ते माझे गुरू आहेत.’ मग तुमच्याच नेत्याबरोबर तुमचं मत जुळत नाही का? या सर्व गोष्टी आपल्याला एकदा ठरवायला हव्यात, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’चा दाखला देणाऱया विरोधकांना चारी मुंडय़ा चीत केले.

प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्जाचा गोवर्धन मोठा आहे, तो सर्वांनी एकत्र येऊन पेलायला हवा

देशाची आर्थिक प्रगती, आर्थिक स्थिती हे मला अजून काही कळत नाही. माझ्याबाबत ‘नया है वह’ असं असू शकेल. समजून घेतोय, परिस्थिती काय आहे. कर्ज किती आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, देवेंद्रजी, सकल-बिकल याची शिकवणी लावायची आहे. अर्थशास्त्र मला शिकायचं आहे. मी यात मस्करी करत नाही. महाराष्ट्र राज्य आपल्या देशातलं सर्वात वैभवशाली राज्य आहे याचा मला अभिमान आहे. याची आर्थिक स्थिती कशी आहे, हे थोडय़ा दिवसांतच बाहेर येईल. पण ही आर्थिक स्थिती सांगत असताना काही कर्ज डायरेक्ट असतात. एमएमआरडीएच्याच कर्जाचं उदाहरण घ्या. एमएमआरडीए ही राज्याच्या बाहेरची संस्था आहे का? जर एमएमआरडीएने कर्ज बुडवलं तर ते कुणाच्या डोक्यावर येणार? राज्याच्या डोक्यावर येणार नाही का? प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्ज धरलं तर या कर्जाचा डोंगर मोठा आहे. मी राज्याची बदनामी करणार नाही. पण अशा वेळी मी आवाहन करतो की, श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर ज्याप्रमाणे गोवर्धन उचलून धरला, त्या गोवर्धनाला सर्व सवंगडय़ांनी काठय़ा लावून पेलून धरला. त्याप्रमाणेच आपल्याला ही भूमिका पार पाडायची आहे. आपण सर्व एकत्र आलो आणि हा कर्जाचा गोवर्धन पेलायचा प्रयत्न केला तर हे सहज शक्य होईल, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी या वेळी केले.

हे माझे वैभव आमचे सरकार हे त्रिशंकू सरकार नाही. आम्ही एकत्र आलेलो आहोत. मनाने एकत्र आलो आहोत…काम करण्यासाठी एकत्र आलो आहेत… आणि सत्ताधारी पक्षाच्या बाकांकडे हात दाखवत ‘हे माझे वैभव आहे’ असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगताच सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी बाके वाजवत अभिनंदन केले.

भाजपच्या नेत्यांनी शेतकऱयांबद्दल केलेल्या वक्तव्याची आठवण यावेळी करून दिली. त्यानंतर महापोर्टलबद्दल बोलताना ते म्हणाले की, महापोर्टलला स्थगिती दिलेली आहे. सर्व त्रुटी दूर केल्यावर परीक्षा पुन्हा सुरू केल्याच तर असे कोण म्हणाले असा एक पेपर टाकावा. त्यामध्ये असे कोण म्हणाले असे सांगत भाजपच्या नेत्यांच्या वक्तव्यांची आठवण करून दिली.

भाजपच्या नेत्यांची वक्तव्ये कोणती होती…

  • शेतकऱयांकडे दुर्लक्ष करा
  • ज्याला शेती करायची असेल तो करेल आणि मरतात त्यांना मरू देत
  • शेतकरी संपावर गेले तरी काही फरक पडणार नाही
  • एवढी तूर खरेदी केली तरी रडतायत साले…
  • किसान सरकार या भगवान भरोसे ना रहे…
  • किसान अपराधी है
  • आवाज वाढवून बोलू नका… सरकारकडे काय नोटा छापायची मशीन आहे?
  • किसान ड्रग्ज और नामर्द की वजह से आत्महत्या कर रहे है…
  • कर्जमाफी दिरंगाईला हे सरकार जबाबदार नाही n शेतकऱयांच्या आत्महत्या ही फॅशन झाली आहे
  • पोलीस ऊस दरवाढीसाठी आंदोलन करणाऱया शेतकऱयांच्या पायावर किंवा छातीवर गोळ्या मारू शकत होते.
  • आत्महत्या करणारे शेतकरी म्हणजे सवलती लाटणारे व्यापारी.
  • अशी ही यादी मोठी आहे, असे सांगताच सत्ताधारी पक्षाच्या बाकावरून विरोधकांचा निषेध करण्यासाठी शेम-शेमच्या घोषणा दिल्या.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयीचे मत मांडले. सावरकर तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. शेजारच्या देशातून आपल्या देशात येणारा जो हिंदू असेल त्याला दोन घास द्या, या सावरकरांच्या विधानाचा दाखला देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात दिला होता. त्यावर बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, इतर देशांतील हिंदू या देशात जरूर घ्या. पण त्यांना ठेवणार कुठे, त्यांना घर देणार कुठे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पण ज्या वेळी कश्मीरमधील हिंदू-कश्मिरी ब्राह्मण हे आपल्याच देशात निर्वासित म्हणून झाले होते तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना आसरा दिला होता. म्हणून या संपूर्ण देशात कश्मीरचे हिंदू स्थिरस्थावर झाले. त्यांच्या येण्याबद्दल आम्हाला आक्षेप नाही. त्यांनी जरुर यावे. बाहेरच्या देशांतील हिंदू आम्ही आमच्या देशात घेत असताना त्यांची काळजी वाहणार कोण, हाही प्रश्न माझ्या मनात आहे, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या भाषणातील बेळगाव, कारवार, निपाणी या सीमा भागातील बांधवांचा उल्लेख केला. सीमा भागातील मराठी बांधव आहेत त्यांना महाराष्ट्रात यायचे आहे. कर्नाटकात सरकार भाजपचे आहे. त्या राज्यात येडीयुरप्पा यांनी बहुमत सिध्द केलेले आहे. सीमा भागातील बांधव हिंदू आहेत. मराठी आहेत. त्यांच्यावर भाषिक अत्याचार होत आहे. केंद्रात भाजपचे सरकार आहे याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. या मराठी बांधवांसाठी आपण एकत्र येऊन केंद्राकडे जाऊन न्याय देऊ शकतो. त्यांचा जो काही आक्रोश आहे तो केंद्राकडे नेला पाहिजे. त्या भागात राज्य विभाजनाची रेष मारली. त्यामुळे माझ्या महाराष्ट्रातील माता-भगिनी- बांधवाचे होत्याचे नव्हते झाले. म्हणूनच पाकव्याप्त कश्मीरच्या धर्तीवर कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र हा नवीन शब्द मी रूढ करत आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की, सीमाप्रश्न कोर्टात आहे. गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राची बाजू घेतली नाही. कर्नाटकाची बाजू घेतली. हे मला सांगायला खेद वाटतो, असे सांगताच सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी केंद्राच्या विरोधात ‘शेम शेम’च्या घोषणा दिल्या. सीमा भागातील बांधव हिंदू आहेत. मराठी बोलल्यावर त्यांच्यावर अत्याचार होत आहे. निषेध दिन साजरा केल्यावर बेळगावची महापालिका बरखास्त केली. याची आठवण या वेळी मुख्यमंत्र्यांनी करून दिली. महापौरांवर राजद्रोहाचा गुन्हा टाकण्यात आला. बेळगाव, कारवार काय पाकिस्तानमध्ये अथवा ब्रह्मदेशात आहे का? असा रोखठोक सवाल यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला. जर आपण आपल्या देशातील हिंदूंना न्याय देऊ शकत नाही तर बाहेरच्या देशातील हिंदूना या देशात आणायचा पुळका कशासाठी? असाही प्रश्न उपस्थित केला. जर आपल्या देशातील भूमिपुत्रांना न्याय देऊ शकत नाही… म्हणूनच मी या वेळी सावरकर यांची आठवण करून दिली. अखंड हिंदुस्थान तो सिंधुनदीपासून सिंधुसागरापर्यंत हा सावरकरांच्या स्वप्नातील हिंदुस्थान आम्हाला हवा आहे. तुम्हाला हवा की नको, असा प्रश्न भाजपला केला. सावरकर दुसऱयांना समजावून सांगण्याऐवजी आपण स्वतः समजून घ्या, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

आपल्याला सावरकरांचे सर्व हिंदुत्व मान्य आहे का, असा प्रश्न भाजपच्या सदस्यांना करीत मुख्यमंत्र्यांनी सावरकरांना गाईबद्दल असलेल्या मताची आठवण करून दिली. एक देश एक कायदा जरूर पाहिजे. पण जेव्हा तुम्ही गोवंश हत्याबंदीचा कायदा केला तेव्हा संपूर्ण देशात हा कायदा का लागू झाला नाही, असा प्रश्न मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला. माझ्या महाराष्ट्रात गोमाता आणि बाजूला जाऊन खाता, असा टोला भाजपला हाणताना केंद्रीय मंत्री रिजीजू यांच्या आणि गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या वक्तव्याची आठवण करून दिली. पर्रीकर दुर्दैवाने आपल्यात नाहीत. पण त्यांनी गोव्यात गोमांस मी कमी पडू देणार नाही, कमी पडले तर गोमांस बाहेरून आणेन, असे वक्तव्य केले होते. रिजीजू तर मी गोमांस खाणार. काय करायचे ते करा असे म्हणाले होते. तुम्ही कोणाला सावरकर शिकवता. सावरकर तुम्हाला- आम्हाला कळलेत का, असा प्रश्न त्यांनी भाजपला केला. ज्या गोष्टी आपल्याला कळलेल्या नाहीत त्यावरून आपण एकमेकांना बोलत राहायचे आणि राज्याच्या सर्वोच्च सभागृहात गोंधळ घालण्याऐवजी प्रथा-परंपरा पाळूया, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

‘आपली संस्कृती आहे ती आपण पाळूया. एकमेकांवर चिखलफेक आणि एकमेकांचे कपडे फाडण्यापेक्षा आपण जे झाले ते बस झाले असे ठरवूया. हेच जर करायचे होते तर मग या सभागृहात का आलो. बाहेर होतो ते बरे होतो. कारण बाहेर हेच करीत होतो.’ असा परखड विचारही मुख्यमंत्री ठाकरे यांनी मांडला. जनादेश म्हणतो त्यामध्ये आपण पन्नास-पन्नास टक्के, पण जाहीर केले होते याची आठवण या वेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी फडणवीसांना करून दिली.

बिहारमध्ये काय झाले? असा सवाल करून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, चाललेले संसार मोडायचे, त्यात घुसायचे. लालूप्रसाद यादव व नितीश कुमारचे सरकार चांगले चालले होते. पण ती युती मोडली. चाललेला संसार मोडणे हे पाप आहे. आम्ही जनादेश तोडला म्हणता तर मग जनता व आम्ही बघून घेऊ. आमचे चुकले असेल तर जनता आमच्या अंगावर येईल. जे तुम्ही केले तेच आम्ही करत आहोत. कारण तुमच्याकडूनच नवीन परंपरा मला शिकायला मिळत आहे. सावरकर आमच्या सोबतच्या पक्षांना पटत असोत अथवा नाही, पण मेहबुबा मुफ्ती तुम्हाला पटत होती का? भारत जलाव पार्टी असे भाजपचे वर्णन करणारे रामविलास पासवान तुम्हाला पटतात का, नितीश कुमार तुम्हाला पटतात का, मोदी हटाव म्हणणारे चंद्राबाबू तुम्हाला पटत होते का? असा खडा सवाल भाजपच्या सदस्यांना केला. या सर्व परंपरा आम्ही तुमच्याकडूनच शिकत आलो आहोत. पण आम्हाला सावरकरांबद्दल शिकवत असताना तुमच्यातील कोणी सावरकरद्वेष्टय़ाने सावरकरांबाबत ट्विट केले होते का, याचाही तुम्ही शोध घ्या, असा टोला मारताच सभागृहाने पुन्हा बाके वाजवून या तडाखेबंद आक्रमणाला दाद दिली.
राज्यपालांचे अभिभाषण हे आमच्या सरकारची प्रगतीची मार्गदर्शिका म्हणून सदैव हातात ठेवून चालू, असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, मी तुम्हाला वचन देतो की ही सगळी कामं आम्ही करून दाखवू. हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल. तेव्हाचा महाराष्ट्र व आताचा महाराष्ट्र यात तुम्हाला फरक दिसेल.

विकासकामांच्या आदेशांमधील त्रुटी दूर करून कामे सुरू करणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण पूर्ण झाल्यानंतर नेहमीप्रमाणे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी बाकावरील अन्य सदस्यांकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी काही सदस्य वेलमध्येही आहेत. कामांना स्थगिती देण्यात आली असून तसा शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. यावर उद्धव ठाकरे यांनी तत्काळ उभे राहत उत्तर दिले. मुख्यमंत्री म्हणाले, सगळे गैरसमज दूर करून या कामांकरिता स्थगिती दिली असेल तर ती लवकरात लवकर उठवली जाईल. आमचे सरकार स्थगिती सरकार नसून प्रगती सरकार आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कोणत्याही कामांना स्थगिती दिली नसून किकासकामांच्या आदेशांमधील त्रुटी दूर करून कामे सुरू केली जातील.

पक्षाच्या पलीकडे जाऊन चांगली कामे

मुख्यमंत्री ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी विदर्भाच्या विकासाच्या संदर्भात बैठक घेतली होती. त्याचा उल्लेख करताना ते म्हणाले की, विदर्भाच्या बैठकीत, त्यात रस्ते झालेले नाहीत, म्हणजे रस्ते होईचिनात, पाणी मिळेचिना, हॉस्पिटल झालेचिना… अशी स्थिती आहे. पण हे मी सर्व सोडवत आहे. त्याला कुठेही स्थगिती दिलेली नाही आणि देणारही नाही. त्या ठिकाणी चांगली कामे सुरू आहेत. पक्षाच्या पलीकडे जाऊन कामे करण्यास परवानगी दिलेली आहे, असे सांगताच सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी बाके वाजवून स्वागत केले. हे सरकार कोणाशीही दुजाभाव करणार नाही, याचा पुनरुच्चार त्यांनी या वेळी केला.

या देशात नवीन कायदे येत आहेत त्यावरून देशात आगडोंब उसळत आहे. हा आगडोंब कायद्यामुळे होतो. मग सरकार तो बदलते. मग पुन्हा नवीन कायदे येतात, असा उल्लेख करीत आपण कसे वागावे हे संत तुकडोजी महाराजांनी सांगितले आहे, असे सांगत मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राजाने कसे वागावे, राजकारण कसे करावे हे सर्व दिले आहे. तुकडोजी महाराज म्हणतात – राज्य चालोनी निरंतर लाखो जीवा उद्धारितो…

सत्तेने जे कायदे केले त्यांचे फायदे मुजोरांनी घेतले आणि दुबळे घोडे मागेच राहिले. ऐसे झाले आज वरी…म्हणूनी कायदाची नव्हे सर्वकाही, प्रचार ऐसे श्रेष्ठ नाही, सर्वांसी मानवतेचे पाठ देई…नियमन तरी न करता…राजे किती आले आणि त्याचे कायदे नष्ट झाले. सत्तेचे दरबार उजाडले परी राज्य चाले संतांचे… संतांचा तो प्रचार अमर.. अजूनही लोकमनावर… राज्य चालोनी निरंतर लाखो जीवा उध्दारितो…
हे काम आमचे महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार केल्याशिवाय राहाणार नाही. हे शब्द आणि वचन या सभागृहाला देत त्यांनी अत्यंत सडेतोड भाषणाचा समारोप केला, तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला मनापासून दाद देण्यासाठी बराच काळ सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांकडून बाके वाजवण्याचे आवाज येत होते.

भाजपची पालखी कायमची वाहणार नाही! खांद्यावरचं ओझं आता उतरवून टाकलं आहे!

देवेंद्रजी, तुम्ही असे म्हणाला होतात की, ‘काँग्रेसच्या सोबत जाऊन मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करीन असा शब्द मी बाळासाहेबांना दिला होता का?’ नव्हता दिला. असा शब्द मी दिलेला नव्हता, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी समोरच्या बाकावर बसलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहात म्हटले, पण दिलेल्या शब्दाचं कौतुक आपल्याला केव्हापासून वाटू लागलं? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. ते पुढे म्हणाले, आम्ही एकमेकांना ठरवून जो शब्द दिला होता तो शब्द तुम्ही पाळणार नसाल. पण एक लक्षात ठेवा, मी मात्र माझ्या वडिलांना दिलेला शब्द पाळणार. त्यासाठी कोणत्याही टोकाला जाईन, कोणत्याही थराला जाईन आणि तो मी गेलो. ते वचन मी पाळलं. जसा मी काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री करीन असा शब्द दिला नव्हता. तसाच मी कायमची भाजपची पालखी वाहणार नाही हा शब्दसुद्धा दिलेला आहे. दोन दिवसांपूर्वीच थोर कलाकार डॉ. श्रीराम लागू यांचं दुर्दैवी निधन झालं. योगायोग आहे, इकडे ‘सामना’चा अंक फडकवला जात होता आणि डॉ. लागूंनी ‘सामना’ चित्रपटात काम केलं होतं. त्या चित्रपटात एक गाणं होतं. आम्ही 25 ते 30 वर्षं जे अनुभवलं. ते या गाण्याचं सार होतं. ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे…’ जे ओझं आम्ही वाहत होतो ते आता उतरवून टाकलं आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षाची अक्षरशः भंबेरी उडवून दिली.

देशाची आर्थिक स्थिती कोमात जात असेल तर ती शरमेची बाब आहे

राज्यपाल महोदयांचा आज कार्यक्रम आहे. भीती मला अशी वाटते की ते मला मुख्यमंत्री म्हणून विचारतील की, राज्यपालांच्या अभिभाषणावर बोललं तर हक्कभंग येतो की काय? या सभागृहातील किती जण खरोखर राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल बोलले आहेत. आर्थिक स्थितीचा उल्लेख करताना किती उद्योग आले हे सुभाष देसाईंना विचारा असे सांगतात. हो, ते होते उद्योगमंत्री. पण राज्यात येणाऱया उद्योगांसाठी उद्योगमंत्री हा एकटा जबाबदार नसतो, बरोबरना देवेंद्रजी. एका बाजूला देसाई जरूर होते, पण दुसऱया बाजूला कसाई होते त्याचं काय? या तुफानी फटकेबाजीवर सभागृहात हास्यस्फोट झाला. हास्याचे फवारे आणि टाळय़ांच्या गजरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, देवेंद्रजी, आपण सांगा, पहिल्या वर्षी मेक इन इंडिया झाला तेव्हा किती लाख कोटींचे एमओयू झाले? काही लाख कोटींचे एमओयू झाले. हो ना! देशात मोदीजींचं सरकार आलं. इथे ‘आपलं’ सरकार आलं. तेव्हा देशा-राज्याबद्दल आकर्षण वाढलं होतं. गुंतवणूकदार येत होते. उद्योगधंदे निर्माण होत होते. या देशात-राज्यात आपलं सरकार आलं म्हणून हे सर्व येत होते. असा मुद्दा मांडून भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कसाई बोललो ते केवळ द्वेषाने नाही बोललो. कसाई एवढय़ासाठीच बोललो की त्यानंतर आलेली नोटाबंदी आणि पाठोपाठ आलेला ‘जीएसटी’ यामुळे आलेले गुंतवणूकदार आल्यापावली परत गेले. पंतप्रधान मोदीजींचे माजी आर्थिक सल्लागार सुब्रमण्यम स्वामीही म्हणाले आहेत की, देशाची आर्थिक स्थिती आयसीयू-कोमामध्ये जाण्यासारखी निर्माण झाली आहे, ही आनंदाची गोष्ट नाही. आम्ही विरोधात आहोत म्हणून त्यांच्यावर टीका करीत आहोत असे नाही. जर देशाची आर्थिक स्थिती कोमात जात असेल तर ती भूषणावह वा गौरवाची बाब नाही. ही लाजेची आणि शरमेची बाब आहे, अशी जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

हिंदुत्व सोडलेलं नाही, धर्मांतर केलेलं नाही!

‘25-30 वर्षं हिंदुत्व म्हणून युतीत सोबत राहिलो…’ मुख्यमंत्री ठाकरे यांनी जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, मी कालही सभेत म्हणालो की हिंदुत्व आम्ही सोडलेलं नाही. आम्ही धर्मांतर केलेलं नाही. कालही हिंदू होतो, आजही आहोत आणि उद्याही राहू. पण सरकार चालवताना किमान समान कार्यक्रमावर एकत्र आलो आहोत. जसं त्या वेळी ममता, समता, जयललिता, चंद्राबाबू, नितीशकुमार यांच्याबरोबर तुम्ही गेलात. जे रामविलास पासवान भाजपला भारत जलाओ पार्टी म्हणाले ते आता तुमचा कंठहार झाले आहेत, असे सांगत भाजपने कुणाकुणासोबत युती केली याची आठवण उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना करून दिली.

एक लक्षात ठेवा, मी मात्र माझ्या वडिलांना दिलेला शब्द पाळणार. त्यासाठी कोणत्याही टोकाला जाईन, कोणत्याही थराला जाईन आणि तो मी गेलो. ते वचन मी पाळलं. जसा मी काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री करीन असा शब्द दिला नव्हता. तसाच मी कायमची भाजपची पालखी वाहणार नाही हा शब्दसुद्धा दिलेला आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा म्हणाले होते की, शिवसेनेने नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून मते मागितली. पण तुमच्या पोस्टरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही फोटो होते. नरेंद्र मोदी यांचा निवडणूक अर्ज मी स्वतः भरायला गेलो होतो. मग मी असे म्हणू का, मी अर्ज भरायला गेलो म्हणून त्यांना मते मिळाली आणि मते मिळाली असतील तर आनंदच आहे. आपण युतीमध्ये लढलो होतो.

झालात तुम्ही बेकार, म्हणून अजब वाटते आमचे सरकार!

अनेक गोष्टी आम्हाला करायच्या आहेत. गती की प्रगती की अधोगती, हे शब्दांचे खेळ मला करायचे नाहीत. पण मला सुधीरभाऊंना सांगायचं आहे. काल माडगुळकरांच्या ओळी त्यांनी इथे सांगितल्या. म्हणाले, ‘उद्धवा, अजब तुझे सरकार’ असा खास उल्लेख करून मुख्यमंत्री ठाकरे पुढे मिश्किल शैलीत म्हणाले, त्यांना मला सांगायचं आहे की मुनगंटीवार, ‘सुधीर नका होऊ एवढे अधीर’ (हशा.) ‘झालात तुम्ही बेकार, म्हणून अजब वाटते आमचे सरकार’ (प्रचंड हशा, बाकांचा आवाज.) राजकारण जुगारासारखं खेळायचं असतं हे विसरलो देवेंद्रजी, तुम्ही जनादेशाचा उल्लेख केलात. शेवटी हे राजकारण आहे. या राजकारणात आम्ही कदाचित चुकत होतो की, यात धर्म आणि राजकारण एक करीत होतो. त्या वेळी आम्ही हे विसरलो की धर्मराजाही जुगारात हरला होता. राजकारण हा जुगार आहे. जुगार हा जुगारासारखा खेळायचा असतो हे आम्ही विसरलो होतो. धर्म आणि राजकारण आम्ही एकत्र करत होतो. आणि त्याचे फटके आम्हाला बसले, अशी भूमिकाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बेधडकपणे मांडली.

सावरकर आमच्या सोबतच्या पक्षांना पटत असोत अथवा नाही, पण मेहबुबा मुफ्ती तुम्हाला पटत होती का? भारत जलाव पार्टी असे भाजपचे वर्णन करणारे रामविलास पासवान तुम्हाला पटतात का, नितीश कुमार तुम्हाला पटतात का, मोदी हटाव म्हणणारे चंद्राबाबू तुम्हाला पटत होते का?

राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार कसे आहे ते सांगताना तुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या काव्याचा हवाला देत मुख्यमंत्री म्हणाले,
पाहुनी सौख्य माझे…
देवेंद्र तोही लाजे…
शांती सदा विराजे….
या झोपडीत माझ्या…
हे गोरगरीबांचे सरकार आहे, असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आमचे सरकार हे रिक्षावाल्यांचे सरकार आहे. बुलेट ट्रेनवाल्यांचे सरकार नाही. शेतकऱयांचे सरकार आहे.

हे आमचं सरकार आहे, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणारच

‘माझा महाराष्ट्र हा आधार या भारताचा’ असे सेनापती बापट म्हणाले होते. तसं येऊया पुढे. एकमेकांमधील गैरसमज देशहित आणि राज्याच्या हिताच्या आड नको येऊ देऊया. जसा शेतकऱयांचा मुद्दा आहे. आम्ही दिलेली वचनं पाळणार. शेतकऱयांना कर्जमुक्त करायचं असेल, त्यांना चिंतामुक्त करायचं असेल तर ते आम्ही करणार. आमचं सरकार हे केल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा दिली.

अच्छे दिन येता येईचिना…

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात भारुडाचा आधार घेतला होता. त्याची आठवण करून देत मुख्यमंत्री म्हणाले, भाजेचीना त्यात रांधले तीन मुगे- म्हणजे मूग ना, असे देवेंद्र फडणवीस आपण म्हणाला होतात. त्यात मुगे म्हणजे मूग. जे मूग मिळून गप्प बसायचे असतात ते मूग ना! म्हणजे 1992-93 मध्ये बाबरीचे पतन घडल्यावर काही जण मूग मिळून गप्प बसले होते तेच ते मूग, असा टोला मुख्यमंत्र्यांनी हाणला. त्यावर सभागृहातच एकच हशा उसळला आणि सत्ताधारी बाकावरच्या सदस्यांनी बाके वाजवून मुख्यमंत्र्यांच्या कोटीला मनापासून दाद दिली. काट्याच्या अणीवर वसली तीन गावे… या भारुडाचा आधार घेत विरोधी पक्षनेत्यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली होती. त्याची सव्याज परतफेड मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या भाषणात केली. त्यासाठी त्यांनी ज्ञानदेवांच्या ओवींचा दाखला दिला.

ज्ञानदेव असते तर-
अच्छे दिन येता येईचिना…
प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख जमा होईचिना…
देशाची बेकारी हटेचिना…
दोन कोटी लोकांना रोजगार मिळेचिना…
स्मार्ट सीटी होईचिना…
विदेशातील काळा पैसा भारतात येईचिना…
आर्थिक मंदी दूर होईचिना…
होईचिना या शब्दावर मुख्यमंत्र्यांच्या सुरात सूर मिसळत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी साथ दिली. यावेळी संपूर्ण सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.