ढेबेवाडीतील नाईकबा मंदिर दर्शनासाठी बंद; 18 मार्चला यात्रेबाबत होणार निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कराडच्या ढेबेवाडी परिसरातील श्री नाईकबा देवस्थान दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. तसेच यात्रेबाबतचा निर्णय 18 मार्चला घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कोरोना व्हायरसचा प्रभाव रोखण्यासाठी याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. श्री नाईकबा देवस्थान कमिटीकडून मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. यात्रेसाठी मुंबईवरून मोठ्या प्रमाणात भाविक येतात ते या ठिकाणी येऊ नयेत. यासाठी यात्रा कमिटी 18 मार्च रोजी निर्णय घेणार आहे.

ढेबेवाडी खोऱ्यातील बहुतांश गावातील नागरिक कामधंद्यासाठी मुंबईत आहे. दरवर्षाप्रमाणे श्री नाईकबा देवस्थान यात्रेसाठी सर्व चाकरमानी गावाकडे येऊन जत्रेमध्ये सहभागी होतात. कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. या पार्श्वभूमीवर पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांच्या सूचनेनुसार कर्नाटक महाराष्ट्रासह देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या बनपुरी-जानुगडेवाडी (ता. पाटण) येथील नाईकबा मंदिरात भाविकांना दर्शनासाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. श्री नाईकबा देवस्थान कमिटीकडून सोमवारी सकाळी मंदिराच्या प्रवेशद्वारास टाळे लावण्यात आले आहे. नाईकबा देवाची यात्रा 29 व 30 मार्चला होणार आहे. कोरोना व्हायरसचा प्रभाव रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना पाहता यावर्षी नाईकबा यात्रा होणार नाही, अशी शक्यता आहे. नाईकबा देवस्थान कमिटी, स्थानिक, ग्रामस्थ आणि प्रांताधिकारी यांची 18 मार्च रोजी एक बैठक होणार आहे. या बैठकीत याबाबत निर्णय होणार आहे.