मनोरुग्ण भावाने कोयत्याने बहिणीचा गळा चिरला, किरकोळ वादातून हत्या; आईवरही वार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

किरकोळ वादातून मनोरुग्ण भावाने कोयत्याने बहिणीचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना आज नालासोपारामध्ये घडली आहे. सुप्रिया कानडे असे मृत महिलेचे नाव आहे. भावाबहिणीचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या आईवरही आरोपीने वार केले असून याप्रकरणी आरोपी भाऊ अजित मालुष्टेला तुळींज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

नालासोपारा पूर्वेतील टाकी रोड येथील सर्वोदय वसाहतीत साईधाम वेल्फेअर चाळ आहे. या चाळीत सुप्रिया कानडे ही महिला राहते. तिच्या शेजारीच आई आणि भाऊ राहतात. सुप्रिया यांचे पती गावी गेले होते. मंगळवारी पहाटे सुप्रिया आणि त्यांचा भाऊ अजित यांच्यात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की अजितने रागाच्या भरात कोयत्याने सुप्रिया यांच्या मानेवर आणि छातीवर वार केले. मुलीला वाचवण्यासाठी आई गेली असता अजितने त्यांच्यावरही वार केले. या हल्ल्यात आई गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हल्ल्यात जखमी झालेल्या सुप्रिया यांचा जागीच मृत्यू झाला तर अजित मालुष्टे या मनोरुग्णावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सुप्रिया यांचा मृतदेह शवविच्छेदनानंतर तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. वसई-विरारमध्ये गेल्या दहा दिवसांत हत्येच्या चार घटना घडल्या आहेत. यातील दोन हत्या या कुटुंबातील सदस्यांनीच केल्याचे समोर आले आहे. एकापाठोपाठ एक अशा चार घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.