
पंधरा दिवस शोधाशोध करूनही बेपत्ता झालेल्या विजय चौहानचा (35) शोध लागत नव्हता.. अशातच त्याची पत्नी आणि शेजारीच राहत असलेला तिचा ‘हिरो’ गायब झाल्याने विजयच्या भावांना संशय आला. त्यांनी लगेचच विजय राहत असलेला गांगडीपाडा गाठला.. त्यावेळी त्यांना घरातील काही टाईल्सचा रंग वेगळा असल्याचे लक्षात येताच त्यांनी काही टाईल्स उकरल्या आणि या भयंकर हत्येचा उलगडा झाला. ‘दृश्यम’ चित्रपटाप्रमाणेच केलेल्या या हत्येने खळबळ उडाली आहे. विजयची पत्नी चमनदेवी हिने प्रियकराच्या मदतीनेच हा काटा काढल्याचे निष्पन्न झाले आहे.
नालासोपारा पूर्वेच्या धानिव बाग येथील गांगडीपाडा येथे विजय पत्नी चमनदेवीसह राहात होता. मागील 15 दिवसांपासून तो बेपत्ता होता. बिलाल पाडा येथे राहणारे चौहान याचे दोन भाऊ त्याचा शोध घेत होते. दरम्यान दोन दिवसांपूर्वी चमनदेवीही बेपत्ता झाली होती. तिच्यापाठोपाठ शेजारी राहणारा मोनू शर्मा हा तरुणही गायब झाल्याने विजयच्या भावांना संशय आला. चमनदेवी आणि मोनू शर्मा यांच्यात प्रेमसंबंध होते आणि त्यातून ते दोघे पळून गेल्याचे निष्पन्न झाल्याने सोमवारी सकाळी चौहान यांचे दोन भाऊ गांगडीपाडा येथील ओम साई या निवासस्थानी आले. त्यावेळी त्यांना घरातील काही टाईल्सचे रंग वेगळे दिसले. त्यांनी टाईल्स काढल्या असता दुर्गंधी येऊ लागली.
पुण्यातून दोघांना ठोकल्या बेड्या
विजय याच्या भावांनी याबाबत पेल्हार पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी धाव घेतलेल्या पोलिसांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढला. यावेळी पालिका डॉक्टर, कर्मचारी, तहसीलदार, फॉरेन्सिक एक्सपर्ट यांच्या उपस्थितीत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान फरार झालेल्या मोनू आणि चमनदेवी यांना पुण्यातून पोलिसांनी बेड्या ठोकल्या